सर्जनशील शुभेच्छापत्रांतून विद्यार्थ्यांनी मांडली शिक्षकांविषयीची भावना” शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रेखाटली आकर्षक शुभेच्छा पत्रे…

सर्जनशील शुभेच्छापत्रांतून विद्यार्थ्यांनी मांडली शिक्षकांविषयीची भावना”
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी रेखाटली आकर्षक शुभेच्छा पत्रे

पिंपरी दुमाला शाळेमध्ये कैलास सत्यार्थी फाउंडेशनचा उपक्रम

शिरूर तालुका │ पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून कैलास सत्यार्थी फाउंडेशनच्या वतीने शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि रंगसंगतीने विविध आकर्षक शुभेच्छापत्रे रेखाटून शिक्षकांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

फाउंडेशनचे समन्वयक लिलाधर रोठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश लिहिण्यास, तसेच अभिनव पद्धतीने शुभेच्छापत्र सजविण्यास प्रोत्साहित केले.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, तसेच आदर्श कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शासकीय स्तरावर सन्मानही होतो.

विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शुभेच्छापत्रांचे मुख्याध्यापक राहुल चातुर, तंत्रस्नेही शिक्षक कांताराम शिंदे, तसेच स्वयंसेविका शोभा डोळस यांनी कौतुक केले. मुलांच्या भावनिक व कलात्मक विकासासाठी या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम महत्त्वाचे असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मनोहर परदेशी यांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना कैलास सत्यार्थी फाउंडेशनचे अभिनंदन केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदर, सर्जनशीलता आणि सामाजिक मूल्यांची जपणूक अधिक दृढ होत असल्याचे शिक्षक आणि मान्यवरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *