अनुसूचित जातीच्या ग्रामपंचायत शिपायावर सरपंच व ग्रामसेवकाचा अन्याय — न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा – राजेंद्र काशिनाथ गायकवाड
नांदूर (ता. दौंड, जि. पुणे)
ग्रामपंचायत नांदूर येथील अनुसूचित जातीचे शिपाई राजेंद्र काशिनाथ गायकवाड यांच्यावर सरपंच युवराज बोराटे व ग्रामसेवक निलेश धारकर यांनी सततचा अन्याय, मानसिक छळ आणि कामावरून हाकलून देण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
गायकवाड यांनी दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती दौंड यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र एक वर्ष उलटूनही प्रशासकीय पातळीवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांच्या रोषाला आणखी उधाण आले आहे.
नियुक्ती पत्र न देता कामावर, पगार व पीएफ मध्ये अन्याय
२४ जानेवारी २०१९ रोजीच्या मासिक सभेच्या कार्यवाहीत गायकवाड यांच्या शिपाई पदाची नोंद असूनही, ग्रामसेवक धारकर यांनी नियुक्ती पत्र दिले नाही. भविष्यनिर्वाह निधी खाते उघडण्यासाठी वारंवार टाळाटाळ केली. ७ सप्टेंबर २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पीएफ कपात करूनही ती रक्कम खात्यात जमा झाली नाही.
कोरोना काळातील जबरदस्ती व खोटे कागद
कोरोना काळात ‘परमनंट करतो’ या आश्वासनावर ग्रामसेवकांनी वैयक्तिक व घरगुती कामे करून घेतली. शिवाय, २१ फेब्रुवारी २०२२ रोजी नियुक्त झाल्याचे दाखवणारे खोटे पत्र तयार करण्यात आले. त्याचवेळी, अनधिकृतपणे दुसऱ्या व्यक्तीस शिपाई म्हणून कामावर घेण्यात आले.
जातीपातीचा विषारी वास
२७ मे २०२५ रोजीच्या ग्रामसभेत, शिपाई असूनही गायकवाड यांच्यावर पाणीपुरवठा व गटारातील घाण काढण्याचे काम लादले. ते न केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली गेली. अनुसूचित जातीचा असल्याने जाणीवपूर्वक अपमानकारक वर्तन केल्याचा गायकवाड यांचा आरोप आहे.
भ्रष्टाचार उघड केल्याचा बदला
फिल्टर पाण्याच्या कॅश बॉक्समधील पैशांबाबत गायकवाड यांनी गैरव्यवहाराची माहिती दिल्यावर त्यांच्यावर गप्प बसण्याचा दबाव आणण्यात आला. यानंतर, बेकायदेशीर नोटिसा देऊन मानसिक छळ सुरू झाला.
प्रशासनाकडे दुर्लक्ष — उपोषणाचा इशारा
१२ डिसेंबर २०२४ रोजी तपासाचा अहवाल तयार होऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने गायकवाड यांचा आरोप आहे की सरपंच व ग्रामसेवक संगनमताने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक वरिष्ठ पत्रकारांशी हातमिळवणी करूनही हे प्रकरण दाबले जात आहे.
राजेंद्र गायकवाड यांनी दोषींवर तातडीने प्रशासकीय कारवाई करून सामाजिक न्याय देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, नांदूर ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.




