अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस; ५०० दिव्यांच्या प्रकाशात राहुल कदम यांचा अनोखा सामाजिक उपक्रम!

अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत साजरा केला वाढदिवस; ५०० दिव्यांच्या प्रकाशात राहुल कदम यांचा अनोखा सामाजिक उपक्रम!

प्रतिनिधी – नवनाथ दोडके 

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत गेल्या चार-पाच वर्षांपासून स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा; अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दिला समाजाला संदेश

 

शिरजगाव काटा : समाजात आजही स्मशानभूमी म्हटले की अनेकांच्या मनात भीती, नकारात्मकता आणि विविध अंधश्रद्धा निर्माण होतात. स्मशानभूमीच्या नावाने अनेक गैरसमज आणि अनिष्ट प्रथा आजही समाजात खोलवर रुजलेल्या आहेत. मात्र, या पारंपरिक समजुतींना छेद देत शिरजगाव काटा येथील शिवछत्रपती दूध केंद्राचे युवा व्यावसायिक श्री. राहुल कदम यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवून समाजासमोर पुरोगामी विचारांचा आदर्श ठेवला आहे. दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते स्मशानभूमीत ५०० दिवे प्रज्वलित करून तसेच केक कापून आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

 

सामान्यतः वाढदिवस म्हटला की मित्रमंडळींचा जल्लोष, केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी आणि अनावश्यक खर्च यांना अधिक महत्त्व दिले जाते. मात्र, राहुल कदम यांनी या रूढ चौकटीपलीकडे जाऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी स्मशानभूमीची निवड केली. त्यांच्या या निर्णयामागे केवळ वेगळेपणा दाखविण्याचा उद्देश नसून समाजातील अंधश्रद्धा, भीती आणि कालबाह्य समजुती दूर करण्याचा सकारात्मक विचार असल्याचे या उपक्रमातून दिसून येते.

 

स्मशानभूमी ही मृत्यूनंतरच्या अंतिम प्रवासाचे ठिकाण असले तरी तिच्याकडे भीतीच्या नजरेने पाहण्याऐवजी जीवनाचे वास्तव स्वीकारण्याची आणि माणुसकीचा विचार करण्याची गरज आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश त्यांच्या उपक्रमातून दिला जात आहे. ५०० दिव्यांच्या प्रकाशाने स्मशानभूमी उजळवून तेथे वाढदिवस साजरा करण्याची ही संकल्पना अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक प्रबोधनाच्या विचारांना बळ देणारी ठरत आहे.

 

या अनोख्या उपक्रमाला दरवर्षी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती लाभते. पुणे जिल्ह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) आदरणीय युनूस शेख साहेब, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नरेंद्र माने, युवा नेते निखिल (दादा) काटे तसेच निखिल दादा काटे प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहून या उपक्रमाला प्रोत्साहन देतात.

 

राहुल कदम यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या धाडसी, पुरोगामी आणि समाजहिताचा विचार करणाऱ्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. विशेष म्हणजे, वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने समाजातील एका महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन घडवून आणण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.

 

आजच्या काळात तरुणाई वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवर हजारो रुपये खर्च करताना दिसते. अशा परिस्थितीत राहुल कदम यांनी निवडलेला हा वेगळा मार्ग निश्चितच विचार करायला लावणारा आहे. समाजात बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते, याचे उदाहरण त्यांनी आपल्या कृतीतून दिले आहे.

 

वाढदिवस हा केवळ स्वतःच्या आनंदाचा दिवस न राहता समाजाला सकारात्मक विचार देण्याची संधी ठरू शकतो, हे राहुल कदम यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. स्मशानभूमीतील ५०० दिव्यांचा प्रकाश केवळ परिसर उजळवत नाही, तर अंधश्रद्धेच्या अंधारातून वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचा मार्गही दाखवतो, हेच या उपक्रमाचे खरे वैशिष्ट्य आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights