चांबळीतील वृद्ध महिलेच्या चोरीचा सासवड पोलिसांकडून उलगडा; अडीच तोळे सोने आणि रोख रक्कम हस्तगत!

चांबळीतील वृद्ध महिलेच्या चोरीचा सासवड पोलिसांकडून उलगडा; अडीच तोळे सोने आणि रोख रक्कम हस्तगत!

 

घराशेजारी गाडीजवळ पुरून ठेवले होते दागिने; सांगली जिल्ह्यातील ३२ वर्षीय आरोपीला अटक, गुन्हे शोध पथकाची कामगिरी

 

प्रतिनिधी – योगेश राऊत

 

पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे वृद्ध महिलेच्या घरातून चोरीस गेलेल्या अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दीड हजार रुपयांच्या रोख रकमेचा सासवड पोलिसांनी यशस्वी तपास करून छडा लावला आहे. सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणातील ३२ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

 

चांबळी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील वृद्ध महिलेच्या घरातून ८ ऑक्टोबर २०२६ रोजी अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि १ हजार ५०० रुपये रोख रक्कम चोरीस गेली होती. याप्रकरणी स्वप्निल लक्ष्मण कणसे, रा. चांबळी यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली.

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाबाबत मार्गदर्शन केले. घटनेची वेळ, ठिकाण, चोरीची पद्धत आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.

 

गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच फिर्यादी यांच्याकडून घटनेबाबत सविस्तर माहिती घेत संशयिताचा शोध सुरू केला. तपासादरम्यान रोहित पोपट काटे (वय ३२, रा. पलूस, जि. सांगली) याचे नाव निष्पन्न झाले.

 

पोलिसांनी संशयित रोहित काटे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक सखोल चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

चोरी केलेले सोन्याचे दागिने चांबळी येथील घराजवळच एका गाडीच्या मागील बाजूस पुरून ठेवल्याची माहिती त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि १ हजार ५०० रुपये रोख रक्कम हस्तगत केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंग गौर आणि सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शंकर राऊत, सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस हवालदार दत्तात्रय काळे, गणेश सोनवणे, पोलीस अंमलदार तुषार लोंढे, प्रवीण शेडे, प्रणय म्हबरे व पारडे यांनी सहभाग घेतला.

 

चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत केल्याने सासवड पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे. विशेषतः चोरीचे दागिने घराजवळच पुरून ठेवण्यात आले असल्याने या तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागात अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनीही घराच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights