पाटसमध्ये भरवस्तीत धाडसी घरफोडी; शिक्षकाच्या फ्लॅटमधून १० लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
सह्याद्रीचा आवाज – विकास साळुंके
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील अंबिकानगर परिसरातील श्री प्राईड अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १० लाख ६० हजार ३३२ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप व कडी तोडून घरात प्रवेश करत कपाटातील लॉकर उचकटून सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी शंकर थोरात (वय ४९, व्यवसाय शिक्षक, रा. श्री प्राईड अपार्टमेंट, अंबिकानगर, पाटस, ता. दौंड) यांच्या फ्लॅटमध्ये ८ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी फ्लॅटच्या सेफ्टी दरवाजाचा लोखंडी कोयंडा तोडून मुख्य दरवाजा कटावणीच्या साहाय्याने उचकटला. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर उचकटले आणि त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे टॉप, फॅन्सी रिंगा, हार, डोर्ले, गंठण, मणी, नेकलेस तसेच महिलांच्या अंगठ्यांचा समावेश आहे. एकूण १६ प्रकारचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले असून, त्यांची किंमत १० लाख ६० हजार ३३२ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, थोरात यांच्या शेजारील फ्लॅटमध्ये राहणारे दिनेश वसंत जाधव यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला होता. एकाच अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट चोरट्यांनी लक्ष्य केल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी संभाजी शंकर थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद ८ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१९ वाजता करण्यात आली आहे.
या घरफोडीचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत. भरवस्तीत असलेल्या अपार्टमेंटमध्ये झालेल्या या चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान यवत पोलिसांसमोर आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







