दौंड तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी आमदार राहुल कुल यांचा पुढाकार; मुख्य अभियंत्यांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा
मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा व भीमा नदीत सोडण्याची मागणी; जनाई-शिरसाई योजना, उजनी फुगवटा क्षेत्रातील बॅरेजेस आणि चिबड जमिनींच्या सुधारणेवर विशेष भर
प्रतिनिधी : योगेश राऊत
दौंड : दौंड तालुक्यातील सिंचन व्यवस्था सक्षम करून शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार राहुल कुल यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता डॉ. प्रवीण कोल्हे यांनी राहू येथे आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन, पाणीपुरवठा आणि शेतीविषयक विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता यावेळी मांडण्यात आली. मुळशी धरणातून वीजनिर्मितीचे प्रमाण कमी करून मुळा-मुठा आणि भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत मागणी करण्यात आली. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेस मदत होऊ शकते.
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देण्याबाबतही चर्चा झाली. तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेअंतर्गत भुलेश्वर फाटा येथील प्रस्तावाला मान्यता मिळण्याबाबत पाठपुरावा करण्याची भूमिका मांडण्यात आली.
उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रात नवीन बॅरेजेस उभारण्याचा प्रस्तावही चर्चेत आला. याशिवाय तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे स्वयंचलित बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. या माध्यमातून पाण्याची साठवण, नियोजन आणि उपलब्ध जलसाठ्याचा प्रभावी वापर करण्यास मदत होऊ शकते.
दौंड तालुक्यातील काही भागांमध्ये चिबड जमिनींची समस्या गंभीर असून, त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. या जमिनी लागवडीयोग्य करण्यासाठी ओपन ड्रेन आणि बंदिस्त जलनिस्सारण वाहिन्यांची कामे हाती घेण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.
शेतकऱ्यांना वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, सिंचनाखालील क्षेत्रात वाढ व्हावी आणि शेतीशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी शासन व संबंधित विभागाच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
या चर्चेतून मांडण्यात आलेल्या विविध प्रस्तावांवर संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाही कशी होते, याकडे आता दौंड तालुक्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






