कर्मयोगी-ओंकार शुगरकडून यंदाही उच्चांकी ऊसदराचे नियोजन; ऊसबिले व वाहतूक देयके आठ दिवसांत मिळणार!

कर्मयोगी-ओंकार शुगरकडून यंदाही उच्चांकी ऊसदराचे नियोजन; ऊसबिले व वाहतूक देयके आठ दिवसांत मिळणार!

 

शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला देण्याचा निर्धार; मागील हंगामातील उर्वरित १५० रुपये दिवाळीनिमित्त देणार

 

इंदापूर (बिजवडी) : यंदाच्या गळीत हंगामात महात्मा फुले नगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना आणि सहयोगी ओंकार शुगर अ‍ॅन्ड डिस्टिलरी पॉवर प्रा. लि. यांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक ऊसदर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला देण्याबरोबरच ऊसबिले आणि वाहतूक देयके वेळेत अदा करण्यावर कारखाना प्रशासनाने विशेष भर दिला आहे.

 

मागील गळीत हंगामात प्रतिटन ३ हजार ३५० रुपये ऊसदर जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी प्रतिटन ३ हजार २०० रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून, उर्वरित १५० रुपये प्रतिटन रक्कम दिवाळीनिमित्त देण्यात येणार आहे. दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या भूमिकेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, शेतकऱ्यांचा घाम आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळणे हाच कारखाना व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे. आर्थिक अडचणींवर मात करून उत्कृष्ट व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यंदाही जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करणे आणि दिलेला शब्द पाळणे याला कारखाना प्रशासनाचे प्राधान्य राहणार आहे.

 

यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसबिले तसेच ऊस वाहतूकदारांची देयके आठ दिवसांच्या आत थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही बोत्रे-पाटील यांनी दिली. ऊस वजन, बिलिंग आणि एफआरपीची वेळेत पूर्तता करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह ऊस वाहतूकदारांनाही मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

 

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना प्रशासन घेत असलेल्या निर्णयांचे समर्थन केले. कर्मयोगी आणि ओंकार शुगर यांच्यातील सहयोग हा सहकार क्षेत्रातील नावीन्यपूर्ण प्रयोग असून, या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, जिल्ह्यातील जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आणि ओंकार शुगरच्या विविध युनिटला पुरवठा करावा, असे आवाहन बाबुराव बोत्रे-पाटील यांनी केले. उच्चांकी ऊसदर, पारदर्शक वजनप्रक्रिया आणि आठ दिवसांत देयके जमा करण्याच्या घोषणेमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि वाहतूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

इंदापूर प्रतिनिधी : अंकुश भोसले

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *