जिजामाता विद्यालयात दीपावली महोत्सव उत्साहात साजरा
( फटाके नकोत, संस्कार हवेत, प्रदूषण नको, निसर्गाचा सहवास हवा – हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न )
जेजुरी, वार्ताहर : शाम जगताप
दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नव्हे, तर आनंद, संस्कार, सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव,याच विचारातून श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालय व जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेजुरी या विद्यालयात दीपावली महोत्सव मोठ्या उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरणपूरक दीपावली साजरी करण्याचा आदर्श संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आकर्षक आणि रंगीबेरंगी रांगोळ्या साकारल्या. तसेच ऐतिहासिक परंपरेची जपणूक करणारा सुंदर किल्ला तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून त्यांची सर्जनशीलता, सांस्कृतिक जाणीव आणि पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता दिसून आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव , राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर तसेच जिजामाता प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
“आनंद साजरा करताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळून दिव्यांच्या प्रकाशात, आनंदात आणि उत्साहात दीपावली साजरी करावी,” असा संदेश प्राचार्य नंदकुमार सागर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांनीही विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना भारतीय संस्कृतीतील सणांचे महत्त्व, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
आजच्या काळात दीपावली म्हटले की फटाक्यांची आतषबाजी, ध्वनीप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी हे चित्र अनेकदा समोर येते. मात्र, जिजामाता विद्यालयाने रांगोळी, किल्ला आणि फटाकेमुक्त दीपावलीच्या संदेशातून सण साजरा करण्याची एक वेगळी दिशा दाखवली आहे.
“फटाके नकोत, संस्कार हवेत; प्रदूषण नको, निसर्गाचा सहवास हवा!” हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
शाळेत रुजलेले पर्यावरणपूरक संस्कार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचतील आणि पालकही आपल्या कुटुंबासह फटाकेमुक्त दीपावली साजरी करण्यासाठी प्रेरित होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
केवळ उत्सव साजरा करणे एवढाच उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये कलात्मकता, ऐतिहासिक जाणीव, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणप्रेम रुजविणारा हा उपक्रम जिजामाता विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याचे वेगळेपण अधोरेखित करणारा ठरला.
यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख अमृता कांबळे, सुनिल भगत,गणेश मगर,ज्योती गावडे,मोनिका निगडे,पौर्णिमा धुमाळ,शिल्पा पाटोळे,छाया साबळे, रसिका भुजबळ, सुनंदा भोंगळे,सुनिता शिंदे,शंकुंतला गोडसे,दिपाली तुपासणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक बाळासाहेब जगताप,सोमनाथ उबाळे,माध्यमिक विभाग प्रमुख प्रल्हाद गिरमे,ज्युनिअर विभाग प्रमुख किरण मोडक,सोनबा दुर्गाडे,अजय जगताप,कैलास सोनवणे,गणेश भंडलकर, महेश खाडे, राघू हारुळे ,कुलदीप साळवे,योगेश घोरपडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर चव्हाण यांनी तर आभार वर्षा देसाई यांनी मानले.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






