दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिद्दीला कलेची साथ; राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत कर्वे समाजसेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिद्दीला कलेची साथ; राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत कर्वे समाजसेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी!

अभिनयासाठी रौप्य पुरस्कार, तर प्रकाशयोजनेत तृतीय क्रमांक पटकावत विद्यार्थ्यांनी उमटवला यशाचा ठसा

 

 

पुणे : दिव्यांगत्व ही यशाच्या मार्गातील अडचण नसून योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास दिव्यांग विद्यार्थीही आपल्या कलागुणांच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठू शकतात, याचा प्रत्यय कर्वे समाजसेवा संस्था, पुणे येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत मिळवलेल्या यशातून पुन्हा एकदा दिला आहे.

 

कर्वे समाजसेवा संस्था, पुणे आणि दि पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने विशेष नाट्यचळवळ राबविण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या अभिनयकौशल्याची आणि कलात्मक क्षमतेची प्रभावी छाप पाडली.

 

या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन कर्वे समाजसेवा संस्थेचे विद्यार्थी ओमप्रकाश गवई यांनी केले, तर नाटकाच्या व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी तन्मय गायकवाड यांनी समर्थपणे सांभाळली. विद्यार्थ्यांच्या सांघिक प्रयत्नांना स्पर्धेत यश मिळाले असून, अभिनयासाठी रौप्य पुरस्कार आणि प्रकाशयोजनेसाठी तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक क्षमतेला राज्यस्तरावर मान्यता मिळाली आहे.

 

संस्थेचे संचालक प्रा. (डॉ.) महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता कला, संस्कृती, नाट्य आणि सामाजिक अभिव्यक्तीच्या क्षेत्रातही समान संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहे.

 

विशेष म्हणजे, या नाट्यचळवळीने विद्यार्थ्यांना केवळ रंगमंच उपलब्ध करून दिला नाही, तर स्वतःमधील क्षमता ओळखण्याची, आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची आणि समाजासमोर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारे आहे.

सह्याद्रीचा आवाज – नवनाथ दोडके 

कला, समावेशकता, जिद्द आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास तेही कोणत्याही क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतात, हा सकारात्मक संदेश समाजासमोर आला आहे.

 

 

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *