उरळगावात बेकायदा मद्यविक्रीवर शिरूर पोलिसांचा छापा; १,७४० रुपयांचा मद्यसाठा जप्त
सह्याद्रीचा आवाज करिता – बालाजी कांबळे
हॉटेल सरकारच्या परिसरात कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर : शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, उरळगाव येथे विनापरवाना देशी व विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून १ हजार ७४० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उरळगाव गावच्या हद्दीत न्हावरे ते तळेगाव रोडलगत हॉटेल सरकारच्या बाजूला पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी सचिन जगन्नाथ जोशी (वय ४६, रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. नागापूर, ता. रेणापूर, जि. लातूर) हा विनापरवाना देशी व विदेशी मद्याचा साठा स्वतःच्या ताब्यात ठेवून ओळखीच्या व्यक्तींना विक्री करताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरून देशी दारूच्या ११ बाटल्या, किंगफिशर कंपनीच्या दोन बिअरच्या बाटल्या, क्लासिक गोल्ड व्हिस्कीच्या दोन बाटल्या तसेच डर्बी स्पेशलच्या दोन बाटल्या असा एकूण १ हजार ७४० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
या प्रकरणात हॉटेल मालक शाहरुख इस्माईल शेख याचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याने सचिन जगन्नाथ जोशी आणि शाहरुख इस्माईल शेख या दोघांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत विनापरवाना मद्यविक्री तसेच इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई अधिक तीव्र करण्यात येत आहे. उरळगाव येथील कारवाईमुळे परिसरातील बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रकरणाची नोंद पोलीस हवालदार मोरे (ब.नं. १५७२) यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार (ब.नं. ३९८) करीत आहेत.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






