बेटवाडीत रोहित्रातील १८ हजारांची तांब्याची तार चोरीला; ऑइल सांडवून नुकसान

बेटवाडीत रोहित्रातील १८ हजारांची तांब्याची तार चोरीला; ऑइल सांडवून नुकसान

Rjnews27 मराठी – योगेश राऊत 

दौंड तालुक्यातील बेटवाडी येथील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड तालुक्यातील बेटवाडी गावच्या हद्दीत शेतातील विद्युत रोहित्र (डीपी) फोडून त्यातील सुमारे १८ हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीदरम्यान रोहित्रातील ऑइल खाली सांडून नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेटवाडी गावातील शेतगट क्रमांक १५२/२ मधील होलेमळा अ‍ॅडिशनल क्रमांक ४ येथील १००/२२ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रामध्ये ही चोरी झाली. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने रोहित्रातील अंदाजे ६० किलो वजनाची, १८ हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली. तसेच रोहित्रातील ऑइल खाली सांडल्याने अतिरिक्त नुकसान झाले.

या घटनेप्रकरणी महावितरणमध्ये नोकरीस असलेले किरण अशोक पवार (वय ३८, रा. पाटील चौक, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मखरे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सहायक फौजदार साबळे यांनी केली.

विद्युत रोहित्रातील साहित्य चोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच संबंधित परिसरातील वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *