राष्ट्रीय स्तरावरील ओपन मार्शल आर्ट चॅम्पियनशिपमध्ये शिवराज बांगरची सुवर्ण कामगिरीअवघ्या तिसरीत शिकणाऱ्या शिवराजने पटकावले गोल्ड व ब्राऊन पदक; पालकांच्या प्रोत्साहनामुळे मिळाले यश
प्रतिनिधी : शाम जगताप
नवी सांगवी : नवी सांगवी येथील द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेल्या शिवराज जितेंद्र बांगर याने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची चमक दाखवत नॅशनल लेव्हल ओपन मार्शल आर्ट चॅम्पियनशिप २०२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शिवराजने ओपन तालो प्रकारात सुवर्णपदक (गोल्ड मेडल) तसेच फाईट प्रकारात ब्राऊन मेडल पटकावत आपल्या शाळेचे आणि कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले.

अवघ्या लहान वयात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे शिवराजचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्यातील सुप्त कलागुणांना योग्य दिशा मिळू शकते, याचे शिवराज हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

शिवराजला लहानपणापासूनच खेळाची विशेष आवड आहे. त्याची ही आवड लक्षात घेऊन त्याचे वडील जितेंद्र बन्सी बांगर आणि आई अश्विनी जितेंद्र बांगर यांनी त्याला क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले. शिक्षणासोबत खेळालाही समान महत्त्व देत पालकांनी शिवराजला आवश्यक मार्गदर्शन, प्रेरणा आणि पाठबळ दिले. त्यातूनच त्याने कठोर मेहनत आणि सरावाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदकांची कमाई केली.
शिवराजच्या या यशामागे त्याची मेहनत, जिद्द आणि पालकांचे प्रोत्साहन यांचा मोठा वाटा आहे. लहान वयातच स्पर्धात्मक वातावरणाचा अनुभव घेत त्याने आत्मविश्वासाने राष्ट्रीय स्तरावर आपली कामगिरी सिद्ध केली आहे.
“मुलांना केवळ शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या आवडीच्या क्रीडा व इतर कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. मुलांवर केवळ अभ्यासाचा ताण न देता त्यांच्या कलागुणांना योग्य दिशा आणि संधी मिळाली पाहिजे. आजची हीच लहान मुले भविष्यात आपल्या भारत देशाचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल करतील. त्यामुळे लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे शिवराजचे वडील जितेंद्र बन्सी बांगर यांनी सांगितले.
शिवराजच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे पालक, शिक्षक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही शिवराजने मार्शल आर्ट क्षेत्रात अशीच उत्तरोत्तर प्रगती करून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







