पाच हजारांच्या आमिषातून उभे केले म्युल अकाउंटचे जाळे तरुणांच्या नावावर बँक खाती उघडून सायबर फसवणुकीची रक्कम वळवली; वानवडी पोलिसांकडून पाच जण जेरबंद

पाच हजारांच्या आमिषातून उभे केले म्युल अकाउंटचे जाळे तरुणांच्या नावावर बँक खाती उघडून सायबर फसवणुकीची रक्कम वळवली; वानवडी पोलिसांकडून पाच जण जेरबंद

 

Rjnews27 मराठी – विकास साळुंके 

पुणे : ‘तुमच्या नावावर बँक खाते उघडा आणि त्याबदल्यात पाच हजार रुपये मिळवा’… या आमिषाला भुलवून तरुणांच्या नावावर बँक खाती उघडायची आणि त्याच खात्यांमध्ये सायबर फसवणुकीतून आलेली लाखो रुपयांची रक्कम वळवायची, असा धक्कादायक प्रकार वानवडी पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील पाच जणांना अटक केली आहे.

 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये श्रवण राजेंद्र अंकुशे (२५, उंड्री), हरीओम हरीराम साहू (२४, साळुंके विहार रोड), सौद इदफान शेख (२३, येरवडा), साहील रौफ शेख (२५, येरवडा) आणि तालीब नुरमोहम्मद शेख (२५, येरवडा) यांचा समावेश आहे. यातील श्रवण अंकुशे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

 

तरुणांना पाच हजारांचे आमिष

 

मुख्य सूत्रधार श्रवण अंकुशे हा आपल्या हस्तकांच्या माध्यमातून तरुणांना हेरत होता. त्यांच्या नावावर बँक खाते उघडून दिल्यास प्रति खाते पाच हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते. आमिषाला बळी पडलेल्या तरुणांच्या नावावर बँक खाती उघडण्यात येत होती.

 

खाते उघडल्यानंतर त्याचे नियंत्रण आणि व्यवहार टोळीतील सदस्यांकडून केले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खात्यांचा वापर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी केला जात होता. त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःची ओळख लपवून पैशांचा व्यवहार करण्यासाठी या खात्यांचा वापर केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.

 

१९ नागरिकांना १.८० कोटींचा गंडा

 

या टोळीने अशा म्युल अकाउंट्सच्या माध्यमातून देशभरातील १९ नागरिकांची एकूण १ कोटी ८० लाख १५ हजार ७९५ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि संबंधित बँक खात्यांची माहिती पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.

 

सायबर फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून तिचा माग काढणे कठीण करण्याचा प्रयत्न या पद्धतीत केला जातो. मात्र, वानवडी पोलिसांनी उपलब्ध आर्थिक व्यवहारांच्या डेटाचा आणि अन्य तांत्रिक माहितीचा तपास करून या टोळीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

 

या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून आणखी किती बँक खाती उघडण्यात आली होती, या खात्यांमधून किती रकमेचे व्यवहार झाले आणि या टोळीचे जाळे नेमके किती ठिकाणी पसरले आहे, याचा तपास सुरू आहे.

 

पोलिसांच्या पथकाची कारवाई

 

परिमंडळ ५च्या पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपींना जेरबंद केले.

 

पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे, समाधान उगले, पोलीस अंमलदार गणेश आगम, अमोल पिलाणे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, दया शेगर, आशिष कांबळे, दिपक क्षिरसागर, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे, अभि चव्हाण, गोपाळ मदने, विष्णू सुतार, तसेच महिला पोलीस अंमलदार चैत्राली यादव आणि रुपाली दिवटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 

बँक खाते भाड्याने देणे किंवा कमिशनच्या आमिषाने दुसऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी स्वतःचे खाते उपलब्ध करून देणे नागरिकांसाठी कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्या गंभीर ठरू शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून बँक खाते, एटीएम, पासबुक, चेकबुक, मोबाइल क्रमांक किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *