शिक्रापूरच्या १० लाखांच्या चोरीचा* *आंध्रप्रदेशात माग* सीसीटीव्हीच्या धाग्यावरून पोलिसांची बिटरगुंट्यात धडक; २ लाख ९० हजारांची रोकड जप्त

*शिक्रापूरच्या १० लाखांच्या चोरीचा* *आंध्रप्रदेशात माग* सीसीटीव्हीच्या धाग्यावरून पोलिसांची बिटरगुंट्यात धडक; २ लाख ९० हजारांची रोकड जप्त

Rjnews 27 मराठी – अंकुश घारे 

शिक्रापूर, ता. शिरूर : शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर उभ्या असलेल्या क्रेटा कारची काच फोडून तब्बल १० लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चोरट्यांचा शिक्रापूर पोलिसांनी थेट आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यापर्यंत माग काढला. सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिटरगुंटा येथे कारवाई करत चोरीच्या रकमेपैकी २ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त केली.

याबाबत अतुल सुभाष जेधे (वय ४०, रा. जेधेवस्ती, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास जेधे यांनी आपली क्रेटा कार शिक्रापूर येथील एसबीआय बँकेसमोर उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आत ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून मिळालेल्या धाग्यांच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. तसेच पोलिसांच्या बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने आरोपींच्या शोधासाठी दोन वेळा आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील बिटरगुंटा परिसरात धडक दिली.

पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे आणि पोलीस कॉन्स्टेबल मच्छींद्र निचीत यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कप्पराल टिप्पा, बोगल मंडल, बिटरगुंटा परिसरात शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान रमेश बाबू गोडेट्टी (रा. कप्पराल टिप्पा, ता. बिटरगुंटा, जि. नेल्लोर) याच्यावर संशय बळावला.

पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता २ लाख ९० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. त्यामुळे शिक्रापूरमधील १० लाख रुपयांच्या चोरीचा तपास परराज्यात पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरीची उर्वरित रक्कम तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जिनेस कोळी, तुषार भोर, अंकुश कारंडे, पोलीस हवालदार अमोल दांडगे, रोहिदास पारखे, शिवाजी चितारे, विश्वंभर वाघमारे, अमोल नलगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नारायण वाळके, राम जाधव, मच्छींद्र निचीत, नागेश वाघमारे आणि भारत भोसले सहभागी झाले.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि पोलीस कॉन्स्टेबल भारत भोसले करीत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *