७२ विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती; शिक्षक संदीप शिंदे यांच्या कार्याचा गौरव

आदर्श शिक्षक संदीप शिंदे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायीथोरांदळे येथे मायेची ऊब फाउंडेशनच्या वतीने जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षक संदीप शिंदे यांचा सन्मान..

 

Rjnews 27 मराठी – शिरूर प्रतिनिधी

थोरांदळे (ता. आंबेगाव) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा मिळावी, यासाठी जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक संदीप शिंदे यांनी केलेले शैक्षणिक कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत मायेची ऊब फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चातुर यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये संदीप शिंदे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या उल्लेखनीय यशाबद्दल मायेची ऊब फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.

थोरांदळे तसेच परिसरातील विविध गावांमधून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संदीप शिंदे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विविध शासकीय शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे तब्बल ७२ विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळवून देण्यात यश आले.

 

 

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाट अधिक सुकर झाली आहे. तसेच लोकसहभागातून आदर्श शाळा उभारण्याच्या उपक्रमातही त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.

 

संदीप शिंदे यांच्या या शैक्षणिक कार्याचा सर्व शिक्षकांना सार्थ अभिमान आहे, अशी भावना शिरूर शिक्षक पतसंस्थेचे सभापती कल्याण कोकाटे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी समाजाच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्याची गरज असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले.

 

कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध निवेदक तथा शेल पिंपळगाव (ता. खेड) येथील शाळेचे मुख्याध्यापक खंडेराव होळकर यांनी सादर केलेल्या कविता गायनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

जिल्हा शिक्षक नेते बाळासाहेब कानडे यांनी संदीप शिंदे यांच्या कार्याचा गौरव करताना विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेल्या निरंतर परिश्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे त्यांच्या कार्यातून दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक हेमराज भदाणे, विनायक पडवळ, शैला थोरात, विजय डोके, मिलिंद चिखले आणि श्वेता चिखले यांनी नियोजन केले. उद्योजक संतोष शेरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *