शिरूरमध्ये गाळ्याच्या ताब्यावरून वाद; ४.१६ लाखांचा मुद्देमाल जबरदस्तीने नेल्याची तक्रार, तिघांसह ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा
Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे
शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील गाळा क्रमांक २५ च्या ताब्यावरून वाद निर्माण झाला असून, यावेळी दमदाटी, मारहाण करून गाळ्यातील सुमारे ४ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन गेल्याची तक्रार शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघा नामांकित व्यक्तींसह ५ ते ६ अनोळखी इसमांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सुभाष फकीरचंद जैन (वय ७०, रा. कमलपार्क, बी.जे. कॉर्नर, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सनी धरमचंद चोरडीया, धरमचंद पोपटलाल चोरडीया, मनीश अभयकुमार चोरडीया तसेच ५ ते ६ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आनंदनगरी सहकारी पतसंस्था, शिरूरचे संचालक आहेत. न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रियेनुसार संस्थेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील गाळा क्रमांक २५ ताब्यात घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता फिर्यादी हे संस्थेचे संचालक व ठेवीदारांसह गाळ्याची साफसफाई करण्यासाठी गेले होते.
यावेळी सनी धरमचंद चोरडीया व धरमचंद पोपटलाल चोरडीया हे तेथे आले. गाळा उघडण्याचा अधिकार कोणी दिला, बाजार समितीचे पत्र आहे का, अशी विचारणा करत त्यांनी वाद घातल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. त्यानंतर सनी चोरडीया याने काही साथीदारांना बोलावून घेतले, तसेच मनीश अभयकुमार चोरडीया यालाही फोन करून घटनास्थळी बोलावून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर संबंधित व्यक्तींनी संगनमत करून गाळ्यातील विविध साहित्य व माल जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यामध्ये खुर्ची, KMG Super Tandoori Atta च्या गोण्या, तीन सॅमसंग मॉनिटर, पाच कॉम्प्युटर CPU, विद्युत इन्व्हर्टर, गोण्या प्रिंट करणाऱ्या पाच मशीन, पाच डिजिटल वजनकाटे, लेझर प्रिंटर/बॅचकोड मशीन, तीन वॉल फॅन तसेच विविध रेकॉर्ड, वह्या, रजिस्टर आणि बिलबुक यांचा समावेश असून, या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख १६ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी २६ सप्टेंबर रोजी रात्री ९.१२ वाजता शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नकाते करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक भागवत यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप हे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवर आधारित असून, घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करीत आहेत.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







