*आयुर्वेद दिनानिमित्त धामारी येथे सेवा संकल्प अभियानातून आरोग्य जनजागृती*
*केंदूर प्रतिनिधी:- कीर्ती साकोरे*
खैरेनगर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे आरोग्य शिबिर, आयुर्वेद वनस्पती प्रदर्शन व वृक्षारोपण; विद्यार्थ्यांना दिनचर्या, ऋतुचर्या व आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले.
धामारी, ता. शिरूर : आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), धामारी, ता. शिरूर, जि. पुणे येथे बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयुर्वेद दिनानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आरोग्य शिबिर, आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रदर्शन, आयुर्वेदविषयक जनजागृती तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
आयुर्वेद हा केवळ आजारांवर उपचार करणारी पद्धती नसून निरोगी जीवनशैली, योग्य आहार-विहार, ऋतूनुसार आचरण आणि शरीर-मनाचे संतुलन राखण्याची भारतीय जीवनपद्धती असल्याचे यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले. दैनंदिन जीवनात आयुर्वेदातील तत्त्वांचा अवलंब केल्यास आरोग्याचे संवर्धन व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत होऊ शकते, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान आयुर्वेदिक वनस्पतींचे प्रदर्शन भरविण्यात आले. विविध औषधी वनस्पतींची ओळख, त्यांचे पारंपरिक उपयोग, औषधी महत्त्व तसेच घराच्या परिसरात औषधी वनस्पतींची लागवड करण्याचे महत्त्व याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. ‘एक कुटुंब – एक औषधी वनस्पती’ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिसरात किमान एक औषधी वनस्पती लावून तिचे संगोपन करावे, असा संदेश देण्यात आला.
खैरेनगर शाळेतील विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे धडे
दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खैरेनगर येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष आयुर्वेद जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना डॉक्टर तुकाराम शिंदे यांनी दिनचर्या व ऋतुचर्या, योग्य आहार-विहार, स्वच्छता, योग-प्राणायाम, आरोग्यदायी सवयी आणि आयुर्वेदाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन ग्रामीण भाषेमध्ये मुलांना समजेल असे सांगितले.सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम व योग करणे, योग्य वेळी व योग्य प्रमाणात आहार घेणे, ऋतूनुसार आहार-विहारात बदल करणे, पुरेशी झोप घेणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे तसेच निसर्गाशी सुसंगत जीवन जगणे यांचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या मनात लहान वयापासूनच ‘निरोगी शरीर, निरोगी मन आणि निरोगी समाज’ ही संकल्पना रुजविण्याच्या उद्देशाने आयुर्वेदविषयक माहिती देण्यात आली.
*आयुर्वेदिक वृक्षांचे वृक्षारोपण*
कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून शाळेच्या परिसरात आयुर्वेदिक व औषधी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष हे केवळ पर्यावरणाचे रक्षण करणारे नसून अनेक वनस्पतींना भारतीय परंपरेत औषधी महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रत्येक रोपट्याची नियमित काळजी घ्यावी आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले.
आयुर्वेद आणि पर्यावरण यांचा असलेला जवळचा संबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगत ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन करा’ असा संदेश यावेळी देण्यात आला. *निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद*
आयुर्वेद दिनाची यंदाची थीम
यंदाच्या आयुर्वेद दिन २०२६ निमित्त आयोजित उपक्रमांमध्ये आयुर्वेदाचा लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंध, आरोग्य संवर्धन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि निरोगी जीवनशैली यावर विशेष भर देण्यात आला. आयुर्वेदाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे आणि पारंपरिक आरोग्यज्ञानाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश होता.
आयुर्वेदातील ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम्’ या मूलभूत विचारानुसार आजार होण्यापूर्वी आरोग्याचे रक्षण करणे आणि आजारी व्यक्तीच्या आरोग्यविषयक समस्यांचे योग्य व्यवस्थापन करणे या दोन्ही बाबींचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती
या कार्यक्रमास माजी विस्तार अधिकारी दत्तात्रय शिंदे, डॉ. तुकाराम शिंदे, प्राथमिक शाळा खैरेनगर चे मुख्याध्यापक किरे सर,डॉ. भाऊसाहेब वाघमोडे, विक्रम मकवाना, ब्रदर गौतम, सिस्टर कीर्ती सामोरे, योग प्रशिक्षक अंकुश घारे, आरोग्य सेविका हिंगे मॅडम, आरोग्य सेवक निलेश शेंडे तसेच सर्व आशा सेविका व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना माझी विस्तार अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की आयुर्वेद हा केवळ उपचाराचा विषय नसून आहार, विहार, योग, प्राणायाम, दिनचर्या, ऋतुचर्या, औषधी वनस्पती, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली यांचा समन्वय असलेली व्यापक आरोग्यदृष्टी असल्याचा संदेश देण्यात आला.
आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाला नागरिक, विद्यार्थी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धामारी आयुष्मान आरोग्यवर्धिनी पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब वाघमोडे यांनी केले
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







