तांदळी येथे कांदाचाळीतून १७ हजार ५०० रुपयांचा कांदा चोरीला
Rjnews27 मराठी – बालाजी कांबळे
शिरूर : तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत शेतातील कांदाचाळीतून अज्ञात चोरट्याने तब्बल ३५ गोणी लाल कांदा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत १७ हजार ५०० रुपये असून, या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तांदळी येथील शेतकरी भाऊसाहेब रघुनाथ गोसावी (वय ६०) यांच्या शेतातील कांदाचाळीत ही चोरी झाली. ३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कांदाचाळीत प्रवेश करून लाल रंगाचा कांदा चोरून नेला.
चोरट्याने एकूण ३५ गोणी कांदा लंपास केला असून, प्रत्येक गोणीमध्ये सुमारे ५० किलो कांदा होता. चोरीला गेलेल्या कांद्याचे एकूण वजन १ हजार ७५० किलो इतके असून, त्याची अंदाजे किंमत १७ हजार ५०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने कांदा चोरून नेल्याची तक्रार भाऊसाहेब गोसावी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणाची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अधिकारी कदम करीत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.



