लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा महाएल्गार; अडथळ्यांवर मात करत मुंबईकडे प्रस्थान
प्रतिनिधी – योगेश राऊत

पाटस : ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १) पाटस येथून मुंबईच्या दिशेने ‘ओबीसी आरक्षण बचाओ महाएल्गार मोर्चा’ काढण्यात आला. मात्र, या मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने सुरुवातीलाच पाटस टोलनाका येथे मोर्चेकऱ्यांना सुमारे दोन ते अडीच तास रोखण्यात आले. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली.

ओबीसी समाजाच्या आरक्षणासह विविध न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मुंबईकडे निघालेल्या मोर्चाला कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा निर्धार लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी ‘मोर्चा मुंबईपर्यंत जाणारच’, अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतल्याने पाटस टोलनाका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मोर्चा पाटस टोलनाक्यावर पोहोचल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी तब्बल तीन वेळा चर्चा केली. मोर्चा पुढे नेऊ नये, अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, हाके यांनी पोलिसांच्या भूमिकेला प्रतिसाद न देता मोर्चा पुढे नेण्याचा निर्धार कायम ठेवला.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या मांडला. इतर समाजांच्या आंदोलनांना किंवा मोर्चांना पोलिस प्रशासनाकडून परवानगी दिली जाते; मग ओबीसी समाजाच्या मोर्चाबाबत वेगळी भूमिका का घेतली जात आहे? असा सवाल मोर्चेकऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला.
मोर्चेकऱ्यांना पाटस टोलनाका येथे रोखण्यात आल्याने पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक कोंडीत अडकली. महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.
वाहतूक कोंडी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस प्रशासनाने बंदोबस्तात काही प्रमाणात शिथिलता आणत मोर्चाला वरवंडपर्यंत जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी मुंबईच्या दिशेने पुढील प्रवास सुरू केला.
पाटसहून वरवंडच्या दिशेने मोर्चा मार्गस्थ झाल्यानंतर वरवंड गावाच्या हद्दीजवळ पुन्हा पोलिस प्रशासनाकडून मोर्चाला रोखण्यात आले. पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल स्वतः पाटस-वरवंड सीमारेषेवर उपस्थित होते.
महामार्गावरील हॉटेल निसर्गसमोर मोर्चा पुन्हा अडविण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी पोलिसांच्या भूमिकेला विरोध करत महामार्गावरच ठिय्या मांडला. काही काळानंतर मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावरच जेवण करण्यास सुरुवात केली. जेवण झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी पुन्हा एकदा पुढील मार्गक्रमण सुरू केले.
मोर्चाला सुरुवातीपासूनच पोलिस प्रशासनाकडून अडविण्याचा प्रयत्न होत असतानाही ओबीसी समाज बांधवांनी एकजूट कायम ठेवली. कोणत्याही परिस्थितीत मुंबईकडे प्रस्थान करण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला.
पोलिस प्रशासन आणि मोर्चेकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर परिस्थिती पाहता मोर्चाला पुढे जाण्यास मुभा देण्यात आली. त्यामुळे पाटसपासून सुरू झालेला ओबीसी आरक्षण बचाओ महाएल्गार मोर्चा पुढे चौफुल्याच्या दिशेने मार्गस्थ झाला.
लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे पाटस परिसरात ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर वातावरण तापले असून, कितीही अडथळे आले तरी मुंबईपर्यंत मोर्चा नेण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या आंदोलनाची पुढील दिशा आणि मुंबईतील आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



