राज्य राखीव पोलीस दलातील भावांना विद्यार्थिनींनी बांधली राखी
निमगाव खलूच्या संजयराव भोसले विद्यालयाचा भावनिक उपक्रम; वृक्षारोपणासह नवनियुक्त मुख्याध्यापक घुटे यांचा सत्कार

अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी | ता. २८
निमगाव खलू (ता. श्रीगोंदा) : राज्याच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना आपल्या कुटुंबीयांपासून, नातेवाईकांपासून आणि सण-उत्सवांपासून दूर राहणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलातील जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निमगाव खलू येथील स्वर्गीय संजयराव पोपटराव भोसले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र, नानवीज-दौंड येथे जाऊन विद्यार्थिनींनी पोलीस दलातील भावांना प्रेमाने राखी बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

राज्याचे माजी मंत्री बबनरावजी दादा पाचपुते यांच्या श्रीगोंदा शिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या स्वर्गीय संजयराव पोपटराव भोसले माध्यमिक विद्यालयाच्या वतीने हा भावनिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. देश व राज्याच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणींची उणीव भासू नये, तसेच समाज आणि पोलीस दलातील बंधुभाव अधिक दृढ व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
या कार्यक्रमास राज्य राखीव दलाच्या पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक वायफळकर साहेब, पोलीस निरीक्षक तांदळे साहेब, पोलीस निरीक्षक खडपकर साहेब यांच्यासह विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक घुटे सर उपस्थित होते. विद्यार्थिनींनी पोलीस जवानांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्याला आणि त्यागाला सलाम केला. या प्रसंगी पोलीस अधिकारी व जवानांनीही विद्यार्थिनींच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस अधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक घुटे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून नात्यांची जपणूक आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाची जपणूक, असा दुहेरी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मुख्याध्यापक घुटे सरांचा सत्कार
यावेळी विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक घुटे सर यांचा पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थितांनी शुभेच्छा देत विद्यालयाच्या शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीसाठी त्यांना सदिच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रफुल्ल खडपकर साहेब आणि जी. डी. देशमुख साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे रक्षाबंधनाचा हा उपक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.
यावेळी विद्यालयातील शिक्षक कोठारे सर, रुपनर सर, मच्छिंद्र कुतवळ सर, ठोसर सर, परदेशी मॅडम, धावडे मॅडम, कर्मचारीवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
चहा-पानानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम आणि वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुख्याध्यापक घुटे सर यांनी राज्य राखीव पोलीस दलातील सर्व अधिकारी व जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस दलातील जवान हे समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असून त्यांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रफुल्ल खडपकर साहेब यांनी मानले. विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून साजरे केलेले हे रक्षाबंधन सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता आणि बंधुभावाचा सुंदर संदेश देणारे ठरले.




