हातवळणच्या शाळेसाठी ग्रामस्थांची एकजूट*पुण्यस्मरणातून  शिक्षणक्रांतीची हाक; सतीश वाबळे यांनी मांडला लोकसहभागातून शाळा परिवर्तनाचा अनुभव*

*हातवळणच्या शाळेसाठी ग्रामस्थांची एकजूट*पुण्यस्मरणा शिक्षणक्रांतीची हाक; सतीश वाबळे यांनी मांडला लोकसहभागातून शाळा परिवर्तनाचा अनुभव*

 

 

 

प्रतिनिधी – योगेश राऊत

 

*हातवळण, ता. दौंड :* पुण्यस्मरणाला समाजप्रबोधन आणि शिक्षणविकासाची जोड देत हातवळणच्या जिल्हा परिषद शाळेसाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ‘पुण्यस्मरणातून शिक्षणक्रांतीचा संकल्प’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कै. सुभद्रा ज्ञानोबा राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या या उपक्रमात सतीश (अण्णा) वाबळे यांनी लोकसहभागातून शाळा परिवर्तनाचा अनुभव मांडला. त्यांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली वाबळेवाडीच्या शाळा व्यवस्थापन समितीत काम करताना आलेला अनुभव वाबळे यांनी मांडला. वाबळेवाडी व जालिंदरनगर येथील शाळांमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून झालेल्या शैक्षणिक परिवर्तनाचा संदर्भ देत शाळेच्या विकासात गावाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळा विकास, लोकसहभाग आणि आधुनिक शिक्षणाबाबत विविध शाळा व ग्रामस्थांना ते मार्गदर्शन करीत आहेत.

 

“जिल्हा परिषद शाळा वाचवायच्या असतील आणि मुलांचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल, तर केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. गावाने आपल्या शाळेची जबाबदारी स्वीकारली, तर लोकसहभागातून शाळेला नवी दिशा देता येते,” असे वाबळे यांनी सांगितले. गावातील अनावश्यक खर्चाला आळा घालून त्यातील काही निधी शाळेसाठी वापरण्याचे आवाहन करताना त्यांनी संगणक, AI, रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.

 

वाबळे यांच्या मार्गदर्शनानंतर राऊत कुटुंबीयांनी ‘राजकारणाचे जोडे शाळेबाहेर ठेवून’ शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत हातवळणचे सरपंच रमेशमामा जगताप आणि कात्रज डेअरीचे संचालक सागरदादा फडके यांनी शाळेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली. विविध राजकीय विचारांचे स्थानिक नेते व कार्यकर्तेही यावेळी एकत्र आले.

 

कार्यक्रमात सतीश (अण्णा) वाबळे यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या AI (Artificial Intelligence) लॅबसाठी देणगी प्रदान करण्याचा उपक्रमही झाला.

 

यावेळी राऊत कुटुंबीयांच्या वतीने नियोजित AI व रोबोटिक्स लॅबसाठी लोकसहभाग निधीत ₹२१ हजारांचे योगदान देण्यात आले. धनादेश मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शितोळे यांनी ग्रामस्थांनी शाळेच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमास हातवळणचे सरपंच रमेशमामा जगताप, विष्णुपंत कोऱ्हाळे, कात्रज डेअरीचे संचालक सागरदादा फडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गडसंवर्धन तालुका उपाध्यक्ष सर्जेराव गरदडे, भाजपा महिला मोर्चाच्या पुणे उपाध्यक्ष निर्मला केसवड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शितोळे, सदस्य मंगेश दादा फडके, मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, नातेवाईक व आप्तेष्ट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *