पाटस, ता. दौंड | प्रतिनिधी : योगेश राऊत

पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि अपघातमुक्त करण्याच्या उद्देशाने महामार्ग प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. महामार्गाच्या हद्दीत उभारण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, व्यवसायिक अतिक्रमणे तसेच वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या विविध अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली असून, यवत ते इंदापूर या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली जात आहे.

३ जुलै २०२६ पासून सुरू झालेल्या या विशेष मोहिमेत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तसेच सर्व्हिस रोडलगत विनापरवानगी उभारण्यात आलेले जाहिरात फलक, होर्डिंग्ज, बोर्ड, तात्पुरते व्यवसाय, उड्डाणपुलाखालील अनधिकृत दुकाने आणि इतर अतिक्रमणे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या अतिक्रमणांमुळे वाहनचालकांचा दृष्टीक्षेप बाधित होणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे आणि अपघातांचा धोका वाढणे अशा समस्या निर्माण होत असल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

भिगवण, कुरकुंभ, लोणी देवकर आदी परिसरात महामार्ग पथकाने विशेष मोहीम राबवत अनेक ठिकाणी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. महामार्गाच्या जागेवर विनापरवानगी उभारण्यात आलेले जाहिरात फलक, लोखंडी संरचना, व्यवसायिक साहित्य आणि इतर अडथळे हटविण्यात आले. यामुळे महामार्गावरील दृश्यता सुधारून वाहतुकीच्या सुरक्षिततेत वाढ होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

 

 

ही मोहीम पुणे–सोलापूर एक्स्प्रेस वे प्रायव्हेट लिमिटेडचे ऑपरेशन मॅनेजर संजय सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या कारवाईत पाटस टोल प्लाझाचे व्यवस्थापक प्रवीण कांबळे, सरडेवाडी टोल प्लाझाचे व्यवस्थापक सतीश चव्हाण, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे प्रभारी अधिकारी सचिन भोजने, सेफ्टी ऑफिसर वसीम शेख तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पेट्रोलिंग कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

महामार्गाच्या कडेला किंवा सर्व्हिस रोडवर सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांमुळे वाहनांची बेकायदेशीर पार्किंग, वाहतुकीत अडथळे आणि वाहनचालकांचे लक्ष विचलित होण्याचे प्रकार घडतात. यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदविले असून, अशा धोकादायक अतिक्रमणांचे उच्चाटन करून सुरक्षित वाहतुकीस प्राधान्य देण्यात येत आहे.

 

महामार्गावर वाहनचालकांना स्पष्ट दृष्टीक्षेप मिळावा, वाहतूक सुरळीत राहावी आणि प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच महामार्गाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे जाहिरात फलक, होर्डिंग्ज, बोर्ड, बांधकाम किंवा व्यवसाय विनापरवानगी सुरू करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, भविष्यात महामार्गाच्या जागेवर नव्याने अतिक्रमण करणाऱ्यांविरोधातही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. महामार्गाची सुरक्षितता ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर वाहनचालक, व्यावसायिक आणि नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत महामार्ग पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “तुमचे सहकार्य एखाद्याचा जीव वाचवू शकते,” असा संदेश देत नागरिकांनी अनधिकृत अतिक्रमणे टाळावीत, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *