शिरसगाव काटा बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमा उत्साहात; धार्मिक प्रबोधनासह गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान

शिरसगाव काटा बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमा उत्साहात; धार्मिक प्रबोधनासह गुणवंत विद्यार्थिनीचा सन्मान

 

प्रतिनिधी : विजय कांबळे

 

नागरगाव : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंचशील तरुण मंडळाच्या पुढाकाराने एप्रिल महिन्यापासून प्रत्येक पौर्णिमेला विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात असून, याच उपक्रमांतर्गत आषाढी पौर्णिमा श्रद्धा, प्रबोधन आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष शशिकांत जगताप गुरुजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आषाढी पौर्णिमेचे तसेच भगवान गौतम बुद्धांच्या काळातील विविध पौर्णिमांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व विशद केले. बुद्धांचे विचार, धम्माचे आचरण, पंचशीलाचे महत्त्व आणि समाजात समता, बंधुता व करुणेची भावना रुजविण्याची गरज यावर त्यांनी प्रकाश टाकला.

या प्रसंगी नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळविल्याबद्दल किरण राजू जाधव हिचा पंचशील तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून एमबीबीएस डॉक्टर होण्याच्या तिच्या ध्येयासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा हा सन्मान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.

 

कार्यक्रमात संतोष भालेराव सर यांनीही आपले विचार व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. धम्म, शिक्षण आणि सामाजिक प्रगती यांचा परस्पर संबंध अधोरेखित करत तरुण पिढीने शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीही जपावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला परिसरातील उपासक-उपासिका, तरुण, महिला, युवक-युवती तसेच लहान मुले व बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे बुद्ध विहार परिसरात धार्मिक आणि सामाजिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

यावेळी प्रशांत केदारी सर यांच्या वतीने उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास केदारी यांनी केले, तर मंडळाचे उपाध्यक्ष कुणाल ईगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नियमित पौर्णिमा आयोजनाच्या माध्यमातून धम्मविचार, शैक्षणिक प्रोत्साहन आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा प्रयत्न पंचशील तरुण मंडळाकडून सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *