“वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची पूजा! बोरी येथे नागनाथ-भैरवनाथ पायी दिंडीचे भक्तिभावाने स्वागत; जठार, सोनवणे व शेळके परिवाराकडून अन्नदानाचा पवित्र महायज्ञ”

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे 

“वारकरी म्हणजे चालता-बोलता विठ्ठल” अशी श्रद्धा जपणाऱ्या महाराष्ट्राच्या पवित्र वारकरी परंपरेचा भावस्पर्शी अनुभव बोरी येथे पाहायला मिळाला. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील श्री नागनाथ मंदिर व श्री भैरवनाथ मंदिरातून प्रस्थान केलेल्या नागनाथ-भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांचे बोरी येथे अत्यंत भक्तिभावाने आणि उत्स्फूर्त वातावरणात स्वागत करण्यात आले.

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा मानत जठार, सोनवणे आणि शेळके परिवाराने अन्नदानाचा पवित्र उपक्रम राबविला. या सेवाभावी कार्यातून वारकऱ्यांना मिसळ-पाव, पोहे, जिलेबी आणि गरमागरम चहाचा प्रसादरूपी अल्पोपहार देण्यात आला. थकलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले, तर “पांडुरंग हरी, वासुदेव हरी” च्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.

हिंदू धर्मात अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. उपाशीपोटी चालणाऱ्या वारकऱ्यांना प्रेमाने अन्न देणे म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलाची सेवा केल्याचे पुण्य लाभते, अशी भावना जठार, सोनवणे व शेळके परिवाराने कृतीतून जपली. त्यांच्या या सेवाभावाचे वारकऱ्यांसह ग्रामस्थांनीही मनापासून कौतुक केले.

यंदा नागनाथ-भैरवनाथ पायी दिंडी सोहळ्याचे १४ वे वर्ष असून चिंचणी, शिरसगाव, धुमाळवाडी, बोरी, हांगेवाडी आणि परिसरातील ५०० हून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि विठ्ठल नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. प्रत्येक पावलागणिक भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संदेश देणारी ही दिंडी महाराष्ट्राच्या संतपरंपरेची गौरवशाली परंपरा जिवंत ठेवत असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.

वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुलांचा वर्षाव केला. या प्रेमळ स्वागतामुळे दिंडी सोहळ्याला अधिकच आध्यात्मिक उंची लाभली. “सेवा, समर्पण आणि हरिनाम” यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने बोरी गाव एक दिवसासाठी जणू विठ्ठलमय झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *