दौंड | प्रतिनिधी – विकास साळुंके (आरजे न्यूज २७ मराठी)
दौंड–केडगाव–पुणे रेल्वे मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत असून, या मार्गावर डेमो (DEMU) गाड्यांच्या फेऱ्या तातडीने वाढवाव्यात किंवा नियमित इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत रेल्वे सेवेत वाढ न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळच्या वेळेत पुण्याकडे जाणाऱ्या तसेच संध्याकाळी दौंडकडे परतणाऱ्या गाड्यांमध्ये अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नसते. विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि व्यावसायिक यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र रोजच पाहायला मिळते. अनेक वेळा प्रवाशांना गाडीत चढणेही अशक्य होते, तर काहींना दरवाजात उभे राहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, दौंड–पुणे मार्गावरील औद्योगिक वसाहती, शैक्षणिक संस्था, सरकारी व खासगी कार्यालये तसेच रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे या मार्गावरील प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, त्या प्रमाणात रेल्वे प्रशासनाने डेमो गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या नाहीत किंवा लोकल सेवेचा विचारही केलेला नाही.
मुंबई उपनगरीय रेल्वेप्रमाणे या मार्गावरही नियमित इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू झाल्यास हजारो प्रवाशांचा वेळ वाचेल, प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होईल, असे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अतिरिक्त डेमो गाड्या सुरू कराव्यात किंवा इलेक्ट्रिक लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. “झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार?” अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, या प्रश्नाकडे स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा प्रवासी संघटना आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रवाशांच्या दैनंदिन हालअपेष्टा कमी करण्यासाठी लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.




