Rjnews27marathi –
“भारत दर्शन – एका भटकंतीची डायरी (अनुभव आणि आठवणी)” या लेखाद्वारे परभणी जिल्ह्यातील बोरी येथील ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा यांनी आपल्या संपूर्ण भारत भ्रमणाचा प्रेरणादायी प्रवास वाचकांसमोर मांडला आहे. तब्बल ११ ते १२ वर्षांच्या कालावधीत स्वकमाईच्या जोरावर आणि एकट्याने भारतातील २८ राज्ये, ८ केंद्रशासित प्रदेश, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप तसेच नेपाळ व भूतान या देशांचा प्रवास पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी सुरू झालेली ही भटकंती रेल्वे, एसटी बस, कार, बाईक, बोट आणि विमान अशा विविध वाहतूक साधनांमधून झाली. चारधाम यात्रा, १२ ज्योतिर्लिंग, शक्तीपीठे, इस्कॉन मंदिरे, गुरुद्वारे, चर्च, बौद्ध स्तूप, मस्जिदी तसेच देशभरातील अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांना त्यांनी भेट दिली.
काश्मीरमधील हिमालय पर्वतरांगा, लडाखचे निसर्गसौंदर्य, केरळमधील बॅकवॉटर, राजस्थानचे वाळवंट, आसाममधील चहाचे मळे, गुजरातचा समुद्रकिनारा, ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमधील निसर्गवैभव यांचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. अंदमान, लक्षद्वीप येथे स्कुबा डायव्हिंग व स्नॉर्केलिंग करताना समुद्रातील विविध जलचर, कोरल्स आणि डॉल्फिन पाहण्याची संधीही त्यांना मिळाली.
भारत भ्रमणादरम्यान विविध भाषा, संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती आणि सामाजिक जीवनाचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्याचे शर्मा यांनी सांगितले. “प्रवास माणसाला अधिक नम्र आणि समृद्ध बनवतो. देशाच्या प्रत्येक भागात वेगळी ओळख, वेगळी संस्कृती आणि निसर्गाचा अद्भुत आविष्कार पाहायला मिळतो,” असे त्यांनी नमूद केले.
भारत हा विविधतेत एकता जपणारा देश असून त्याचा इतिहास, अध्यात्म, संस्कृती आणि निसर्गसंपदा जगभरात वेगळी ओळख निर्माण करते. या संपूर्ण प्रवासातून मिळालेले अनुभव आणि ज्ञान आजही प्रेरणादायी असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
ग्रामीण भागातून आलेल्या एका युवकाने जिद्द, चिकाटी आणि साहसाच्या बळावर संपूर्ण भारत भ्रमण पूर्ण केल्याची ही कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. देशातील पर्यटन, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म यांचा अभ्यास करण्यासाठी युवकांनीही प्रवासाला प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी आपल्या लेखातून दिला आहे.




