“रुग्णासाठी रात्रंदिवस धावणाऱ्या ‘त्या’ हातांना मान कधी मिळणार?”

रुग्णालयातील एखादा रुग्ण वेदनेने तडफडत असतो, नातेवाईक घाबरलेले असतात, डॉक्टर येईपर्यंत रुग्णाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला धीर देणारी व्यक्ती म्हणजे “नर्स”. एखाद्या आईप्रमाणे रुग्णाची काळजी घेणारी, स्वतःच्या भावना बाजूला ठेवून दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस-रात्र झटणारी ही सेवाभावी महिला आजही समाजात आणि व्यवस्थेत दुय्यम स्थानावरच असल्याची वेदनादायी वस्तुस्थिती आहे.
आज जगभरात आंतरराष्ट्रीय नर्स दिन साजरा केला जात असताना, अनेक नर्सेस मात्र हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये, ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि आपत्कालीन सेवेत कर्तव्य बजावत आहेत. कुणाचा जीव वाचावा म्हणून स्वतःचे दुःख, थकवा आणि भूक विसरणाऱ्या या “पांढऱ्या देवदूतांना” आजही अपेक्षित मान-सन्मान मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
नर्स होण्यासाठी कठोर शिक्षण, प्रशिक्षण, संयम आणि माणुसकीची गरज असते. रुग्णाच्या वेदना समजून घेणे, इंजेक्शनपासून डिलिव्हरीपर्यंत प्रत्येक जबाबदारी पार पाडणे, औषधांची वेळ पाळणे, रुग्णांची स्वच्छता राखणे, मानसिक आधार देणे ही सर्व कामे नर्सेस अत्यंत प्रामाणिकपणे करत असतात. अनेक वेळा डॉक्टर येण्यापूर्वी रुग्णाजवळ सर्वात आधी नर्सच उभी असते.
विशेष म्हणजे एखाद्या नवजात बाळाला या जगात सर्वप्रथम हातात घेणारी व्यक्ती अनेकदा “नर्स” असते. आईनंतर त्या लेकराला प्रेमाने स्पर्श करणारे हात हे नर्सचेच असतात. तरीही समाजात सर्व श्रेय फक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच दिले जाते आणि नर्सच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाते, अशी भावना अनेक नर्सेस व्यक्त करतात.
सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या नर्सेसच्या वेतनात मोठी तफावत असल्याचे वास्तवही समोर येत आहे. काम समान असतानाही खाजगी रुग्णालयातील नर्सेसकडून अधिक काम करून घेतले जाते, मात्र वेतन कमी दिले जाते. अनेकांना पुरेशा सुट्ट्या नाहीत, तर काही जणी कंत्राटी पद्धतीवर अत्यल्प मानधनात सेवा देत आहेत. उन्हातान्हात गावोगावी फिरून आरोग्य सेवा पोहोचवणाऱ्या ग्रामीण भागातील नर्सेस आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र आहे.
कित्येक वेळा जेवणाच्या ताटात घास घेत असतानाही रुग्णाची हाक आली की त्या सर्व काही सोडून धावत जातात. स्वतःच्या घरातील जबाबदाऱ्या सांभाळून दुसऱ्यांच्या जीवासाठी लढणाऱ्या या महिलांच्या त्यागाची दखल समाजाने आणि सरकारने घेण्याची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय नर्स दिनानिमित्त नर्सेसची एकच अपेक्षा आहे — “समान काम, समान वेतन आणि सन्मान.”
आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या नर्सेसना केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर मानवतेची सेवा करणाऱ्या योद्ध्या म्हणून पाहिले जावे, अशी भावना व्यक्त होत आहे.
तसेच, प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आपल्या गावातील सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या प्रत्येक नर्सचा सन्मान आपल्या पद्धतीने करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. फुलांचा गुच्छ, सत्कार, सन्मानपत्र किंवा फक्त दोन कौतुकाचे शब्द जरी दिले तरी त्या नर्सेससाठी तो मोठा सन्मान ठरू शकतो.
आज प्रत्येक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या नर्सेसचा सन्मान व्हावा, त्यांच्या कामाची दखल घेतली जावी आणि त्यांच्या त्यागाला योग्य मान मिळावा, हीच आंतरराष्ट्रीय नर्स दिनानिमित्त समाजाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“रुग्णाच्या डोळ्यातील अश्रू पुसणाऱ्या त्या हातांना… आज एक सलाम!”
Rjnews27 मराठी तर्फे सर्व नर्सेसना आंतरराष्ट्रीय नर्स दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *