विजय कांबळे | प्रतिनिधी
नागरगाव : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील आंधळगाव परिसरात सध्या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत होत असलेल्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांचे हाल होत असून अंधाराचा फायदा घेत बिबट्या थेट वाड्या-वस्त्या, शेत परिसर आणि मानवी वस्तीजवळ फिरताना दिसत असल्याने नागरिक अक्षरशः दहशतीखाली जीवन जगत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आंधळगाव व परिसरातील अनेक भागांमध्ये नियमितपणे सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडत असून नागरिकांना रात्री घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “बिबट्या कधी आणि कुठे समोर येईल, याचा नेम नाही,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, अंधार पडताच बिबट्याचा वावर वाढत असून अनेक वेळा तो शेतातील पिकांमध्ये, रस्त्यालगत तसेच जनावरांच्या गोठ्याजवळ दिसून आला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातही भीतीचे सावट पसरले आहे. रात्री शेतीची कामे, जनावरांची देखभाल किंवा प्रवास करणेही धोकादायक बनले आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यांत दहा ते बारा नागरिकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ सध्याच्या परिस्थितीकडे अत्यंत गंभीरतेने पाहत असून वनविभाग व प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
आंधळगाव विकास सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पांढरे यांनी महावितरण प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “लोडशेडिंग करायचेच असेल तर ते सकाळी पाच ते नऊ या वेळेत करावे. सायंकाळी आणि रात्री अंधारात वीज बंद करून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार थांबवावा,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत तातडीने उपाययोजना न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सध्या बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे आंधळगाव परिसरात भीतीचे सावट पसरले असून वनविभागाने गस्त वाढवून पिंजरे लावावेत, तर महावितरणने रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.




