कस्तुरी महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न
शिरूर प्रतिनिधी
कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धा निमित्त एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे संशोधनवृत्तीबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याचे या कार्यशाळेतून स्पष्ट झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री पलांडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाचे महत्त्व पटवून दिले. “विद्यार्थ्यांचे संशोधन समाजाभिमुख असावे आणि त्यातून नाविन्यपूर्ण प्रकल्प उभे राहावेत. यासाठी महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक संशोधन समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
यानंतर उप-प्राचार्या प्रा. मंगल बैनाडे यांनी संशोधन प्रकल्प विषय निवड, रचना व प्रत्यक्ष अंमलबजावणी या संदर्भात विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधन प्रक्रियेतील पायऱ्या स्पष्ट करून त्याचा शैक्षणिक व व्यावहारिक जीवनातील उपयोग अधोरेखित केला.
प्राचार्य डॉ. पंकज गुप्ता यांनी “मानवी विकासात संशोधनाचे स्थान” या विषयावर विचार मांडले. त्यांनी संशोधन हे फक्त शैक्षणिक प्रगतीसाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित केले.
या कार्यशाळेत प्रा. निलेश ढोबळे, प्रा. शाफिया अत्तार, प्रा. मायावती कोल्हे, प्रा. मीरा डफळ यांच्यासह सर्व प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोनिका बोराटे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. शिवाजी सोनटक्के यांनी केले.
या मार्गदर्शन कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण झाली असून, आगामी आविष्कार संशोधन स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प यशस्वीपणे झळकतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




