जीवंत माणसाचे मांस खाणाऱ्या अळीने धास्ती; मेक्सिको- अमेरिका सीमेवर वाढला धोका….

जीवंत माणसाचे मांस खाणाऱ्या अळीने धास्ती; मेक्सिको- अमेरिका सीमेवर वाढला धोका….

RJNEWS27MARATHI.COM

जीवंत माणसाला आणि जनावरांना जखमेच्या ठिकाणाहून आत शिरून मांस खाणाऱ्या एका परजीवी अळीने (Screwworm) मेक्सिको व अमेरिकेत खळबळ माजवली आहे. या अळीच्या दंशाचे ५,०८६ हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली असून त्यापैकी ४१ प्रकरणे माणसांमध्ये आढळली आहेत. अमेरिकेत पहिल्यांदाच एका प्रवाशामध्ये ही अळी सापडल्याने आरोग्य क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.

स्क्रुवॉर्म म्हणजे काय?

ही अळी खरं तर एका परजीवी माशीचा लार्वा आहे. मादी माशी जीवंत जनावरांच्या किंवा माणसांच्या जखमेत अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या त्या जखमेतील मांस जिवंत अवस्थेत खाते. यामुळे तीव्र वेदना, जखमेचे संसर्ग, सेप्सिस (रक्तसंसर्ग) आणि मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मानवी प्रकरणे तुलनेने कमी असली तरी ती अत्यंत गंभीर ठरतात.

मेक्सिको ते अमेरिका : प्रादुर्भावाची साखळी

मेक्सिकोत याचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून जनावरांमध्ये गायी, कुत्रे, घोडे यांचा समावेश आहे.

अमेरिकेत पहिल्यांदा मॅरीलँड राज्यात एका व्यक्तीमध्ये या अळीचा दंश आढळून आला. तो व्यक्ती एल सल्वाडोर येथून प्रवास करून आला होता.

या प्रादुर्भावाने अमेरिका-मेक्सिको सीमेवर पशुधन उद्योगासाठी गंभीर संकट निर्माण केले आहे.

धोका किती गंभीर?

उत्तर कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक मॅक्स स्कॉट यांच्या मते, संक्रमण सुरू झाले तर अळ्या शरीरातील कोणत्याही अवयवात – अगदी मेंदूपर्यंत – पोहोचू शकतात. वेळेत उपचार न झाल्यास संसर्ग प्राणघातक ठरू शकतो.

सरकारची तयारी

अमेरिकेने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

२०२५ मध्ये USDA ने टेक्सासच्या एडिनबर्ग येथे पहिली “स्टेराईल फ्लाय प्रोडक्शन फॅसिलिटी” उभारली आहे.

इथे दर आठवड्याला ३० कोटी नपुंसक नर माशा तयार करून हवेत सोडल्या जातील.

रेडिएशनद्वारे या माशांना नपुंसक केले जाईल. अशा नर माशीशी संबंध आल्यावर मादी अंडी घालू शकणार नाही.

यामुळे स्क्रुवॉर्मच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

अमेरिकेने १९६६ मध्ये अशाच पद्धतीने या परजीवीवर नियंत्रण मिळवले होते. २०१७ मध्येही पुन्हा प्रादुर्भाव झाल्यावर हाच पर्याय वापरला गेला होता. मात्र यंदा मेक्सिको व अमेरिका सीमेवर झालेल्या नव्या प्रादुर्भावामुळे पशुधन उद्योग, मानवी आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *