बुद्धीबळ स्पर्धेतही विद्याधाम प्रशालेची बाजी – सात विद्यार्थी जिल्हा पातळीवर

कराटेबरोबरच शिरूर तालुक्यातील विद्यार्थी बुध्दीबळ या मेंदूला चालना देणाऱ्या खेळातही उत्तम कामगिरी करत आहेत. अलीकडेच कोंढापुरी येथील आर.एम. धाडीवाल विद्यालयात झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेतही विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

१४ वर्षांच्या गटात तन्मय पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला, तर अर्णव पाटीलने तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे वयोगटात ईश्वरी खेसेने द्वितीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले. १९ वर्षे वयोगटातील वैष्णवी बनकरने द्वितीय क्रमांक पटकावला, तर आदिती खोसेने तृतीय क्रमांक मिळवला.
या निकालांमुळे शाळेतील एकूण सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मेंदूला धार लावणाऱ्या या खेळात अशी झेप घेणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे क्रीडा विभाग प्रमुख सचिन रासकर, क्रीडा स्पर्धा प्रमुख संतोषकुमार देंडगे आणि क्रीडा शिक्षक संदिप तानवडे, दीपक गुजर, नामदेव भांगले तसेच शरद दरवडे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शालेय समितीचे अध्यक्ष धरमचंदजी फुलफगर, प्रशासकीय अधिकारी संजय देशपांडे, प्राचार्य गुरूदत्त पाचर्णे आणि पर्यवेक्षक मंडळातील दिगंबर नाईक, मच्छिंद्र बनकर व चंद्रकांत देविकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी केवळ स्पर्धा राहिली नाही, तर बुद्धी, संयम व युक्तीच्या खेळात पुढे जाण्याचे पाऊल ठरली आहे.




