पाटसमध्ये मोफत मोतीबिंदू अभियान; ५,७०४ रुग्णांच्या जीवनात दृष्टीचा उजेड

पाटसमध्ये मोफत मोतीबिंदू निदान अभियानाची अखंड सेवा; ५,७०४ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

 

पाटस : प्रतिनिधी – योगेश राऊत

 

ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना वेळेत नेत्रतपासणी व मोतीबिंदूवरील उपचार मिळावेत, या उद्देशाने नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, पाटस आणि बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जून २०१६ पासून मोफत मोतीबिंदू निदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सप्टेंबर २०२६ अखेर तब्बल ८ हजार ८०२ रुग्णांची नेत्रतपासणी, तर ५ हजार ७०४ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच २ हजार ७१४ रुग्णांना अल्पदरात चष्मेवाटप करण्यात आले आहे.

 

दर महिन्याच्या २० तारखेला पाटस येथे मोफत मोतीबिंदू निदान शिबिर आयोजित केले जाते. मंगळवार, २० ऑक्टोबर रोजी झालेल्या शिबिरात १७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असून, ११ रुग्णांना २३ ऑक्टोबर रोजी पुढील उपचारासाठी बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क, पुणे येथे पाठविण्यात आले.

 

या उपक्रमासाठी बुधराणी हॉस्पिटलचे श्री. गिरीश पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी नागनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष नेत्रमित्र डॉ. पांडुरंग श्रीपतराव लाड उपस्थित होते.

 

आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना दृष्टीचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू असलेले हे अभियान अनेकांसाठी आधार ठरत आहे. ‘अंधत्वाकडून दृष्टिकडे मुक्त अभियान’ या संकल्पनेतून मोतीबिंदूमुक्त समाजासाठी ही सेवा भविष्यातही सुरू ठेवण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *