सोमेश्वर कारखाना निवडणुकीत शेतकरी हिताला प्राधान्य सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ‘कप-बशी’ पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

 सोमेश्वर कारखाना निवडणुकीत शेतकरी हिताला प्राधान्य सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत ‘कप-बशी’ पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

Rjnews27 मराठी – विकास साळुंके 

करंजे, बारामती : श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि.च्या पंचवार्षिक निवडणूक २०२६-३१च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शिवसेना पुरस्कृत ‘श्री. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल’च्या प्रचाराचा शुभारंभ करंजे येथे करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित सभासद बंधू-भगिनींना संबोधित करत कारखान्याच्या विकासासोबत शेतकरी हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

 

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “श्री. सोमेश्वर कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. आदरणीय अजितदादांनी ज्या दिशेने कारखान्याच्या विकासाचे काम केले, त्याच दिशेने कारखान्याला पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील.” ही निवडणूक केवळ पदासाठी नसून पुढील पिढीच्या भवितव्यासाठी आहे. तसेच ही निवडणूक गटबाजीसाठी नसून शेतकरी हितासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

अजितदादा पवार यांनी तब्बल ३४ वर्षे सोमेश्वर कारखान्यासाठी काम केले. कारखान्याला पाणी कमी पडू नये यासाठी प्रयत्न करण्यापासून विविध प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्यापर्यंत त्यांचे सोमेश्वर कारखान्याशी असलेले नाते कायम राहिले आहे, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

 

हा कारखाना कोणत्याही एका व्यक्तीचा नसून सभासद आणि शेतकऱ्यांचा असल्याचे सांगत सुनेत्रा पवार यांनी अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांचा मेळ साधून कारखान्याच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका मांडली. सर्वांना सोबत घेऊन कारखान्याच्या प्रगतीसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

“सोमेश्वरचा होणारा चेअरमन हा नाव गाजवणारा नसेल तर महाराष्ट्रात भाव गाजवणारा असेल,” असे सांगत भावी चेअरमनची निवड सर्व २१ विजयी संचालकांना विश्वासात घेऊन केली जाईल, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले. सभासदांच्या मनातील व्यक्तीला ही जबाबदारी मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

दरम्यान, ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानात ‘कप-बशी’ चिन्ह असलेल्या पॅनलच्या सर्व २१ उमेदवारांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन सुनेत्रा पवार यांनी सभासदांना केले. सभासदांचा आशीर्वाद या पॅनलला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

यावेळी पॅनलचे पदाधिकारी, उमेदवार तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *