रांजणगावात पुन्हा रक्तरंजित हल्ला; कोयता, दगड, काठी अन् फायटरने तरुणांवर हल्ला
Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यात हिंसक घटनांची मालिका; काही दिवसांतच हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून मारामारी, हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच रांजणगाव गणपती परिसरात पुन्हा एकदा तरुणांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. वामन वाईन्स परमिट रूमसमोर १८ सप्टेंबर रोजी रात्री तरुणावर तसेच त्याला वाचवण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर टोळक्याने कोयता, दगड, काठी आणि फायटरने हल्ला केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आदित्य तुषार शितोळे (वय १९, रा. रांजणगाव गणपती) यांच्या फिर्यादीवरून धनंजय साळुंखे, गोरख मोरे, मयूर कांबळे यांच्यासह सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, यापूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी गर्दी जमवून शितोळे यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी, दगडाने तसेच फायटरने मारहाण केली. दरम्यान, शितोळे यांना वाचवण्यासाठी दादा खेडकर हे पुढे आले असता त्यांच्यावरही कोयता, दगड आणि काठीने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात दोघेही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. पूर्वीच्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, शिरूर शहरातही १८ सप्टेंबर रोजी पहाटे गोळीबाराची घटना घडली असून, या घटनेत हरीश गंगावणे यांचा मृत्यू झाला. एकाच कालावधीत तालुक्यात हल्ले आणि गोळीबाराच्या घटना समोर आल्याने कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
रांजणगाव औद्योगिक परिसरासह शिरूर तालुक्यात नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पोलिसांची गस्त, संशयितांवर नजर आणि प्रतिबंधात्मक कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके करीत असून, गुन्हा सहायक पोलीस निरीक्षक मोरडे यांनी दाखल केला आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







