मुरूम वाहतुकीदरम्यान महसूल अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटीचा आरोप देऊळगाव राजेत दोघांविरुद्ध गुन्हा; हायवासह मुरूम जप्त

देऊळगाव राजेत रॉयल्टी न भरता मुरूम वाहतूक केल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Rjnews27 मराठी – विकास साळुंके 

दौंड : देऊळगाव राजे ते वडगाव दरेकर मार्गावर शासकीय रॉयल्टी न भरता मुरूमाची उत्खनन करून वाहतूक केल्याच्या आरोपावरून दोन जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शासकीय महसूल अधिकारी शुभांगी बबन गुंड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संबंधित हायवा वाहनासह मुरूम असा एकूण १० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल नमूद केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता मौजे देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे येथील देऊळगाव राजे ते वडगाव दरेकर रोडवर घडली. या ठिकाणी हायवा क्रमांक MH-14-LR-5587 मधून मुरूमाची वाहतूक केली जात असल्याचे महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

 

फिर्यादी शुभांगी गुंड या ग्राम महसूल अधिकारी म्हणून शासकीय काम करीत असताना, अंबादास शेळके (पूर्ण नाव माहीत नाही) आणि नरेंद्र दादा कोरे, दोघेही रा. देऊळगाव राजे, ता. दौंड, जि. पुणे, यांनी शासकीय रॉयल्टी न भरता गौणखनिज असलेल्या मुरूमाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. संबंधित मुरूमामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार हायवामध्ये अंदाजे ५ ब्रास मुरूम आढळून आला असून त्याची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याचे नमूद आहे. तसेच मुरूम वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या भारतबेझ कंपनीच्या १० टायर ट्रकची अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे मुरूम आणि वाहनाची एकत्रित किंमत १० लाख ३५ हजार रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

 

दरम्यान, शासकीय कामकाज सुरू असताना संबंधितांनी शिवीगाळ व दमदाटी करून हाताच्या बाह्या वर सरसावत अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार ३११ म्हेत्रे करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक कुंभार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights