तांदळी येथे शॉर्टसर्किटने दीड एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

तांदळी येथे शॉर्टसर्किटने दीड एकर ऊस जळून खाक

Rjnews27 मराठी – राम कांबळे 

महावितरणच्या वीजवाहक तारांमधून ठिणगी पडल्याचा शेतकऱ्याचा दावा; पंचनाम्यानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणी

 

शिरूर : तांदळी (ता. शिरूर) येथे शॉर्टसर्किटमुळे शेतातील सुमारे दीड एकर उभा ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकरी दत्तात्रय निवृत्ती गदादे यांच्या ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यादेखत जळून गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

 

दत्तात्रय गदादे यांच्या शेतातून महावितरणचे विद्युत खांब आणि वीजवाहक तारा गेलेल्या आहेत. या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याने ऊस पिकाला आग लागल्याचे गदादे यांनी सांगितले. आग लागल्यानंतर काही वेळातच ती वेगाने पसरली आणि दीड एकर क्षेत्रातील उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.

 

घटनेची माहिती मिळताच पोपट गदादे, नवनाथ गदादे, आबा गदादे, धनंजय गदादे, रोहित खोरे, सौरभ गदादे, गोरख गदादे, रोहिदास गदादे, नंदू खोरे आणि तुषार गदादे यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस जळून खाक झाला.

 

या घटनेत दीड एकर क्षेत्रातील उभ्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.

 

महावितरणच्या वीजवाहक तारांमधील बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत, पंचनाम्यानुसार झालेल्या संपूर्ण नुकसानीची योग्य ती भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकरी दत्तात्रय गदादे यांनी केली आहे.

 

“कष्टाने पिकवलेला ऊस डोळ्यादेखत जळून गेला. या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी दत्तात्रय गदादे यांनी केली आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights