दौंडमध्ये स्वरनाद पुनर्वसन केंद्राची यशस्वी वाटचाल; श्रवणदोष असलेल्या बालकांसाठी ठरत आहे आशेचा किरण
प्रतिनिधी : योगेश राऊत
श्रवणदोष असलेल्या लहान मुलांना ऐकणे, बोलणे आणि मुख्य प्रवाहातील शिक्षणासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच संस्थेच्या स्वरनाद पुनर्वसन केंद्राने दौंडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत अनेक बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) यांच्या तीन वर्षांच्या संशोधन प्रकल्पांतर्गत सन २०२२ मध्ये सुरू झालेले हे केंद्र प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आता कॉक्लिआ पुणे संस्थेमार्फत नियमित स्वरूपात सुरू ठेवण्यात आले आहे.
दौंड शहरातील शालीमार चौक, फॉरेस्ट ऑफिससमोर कार्यरत असलेल्या या केंद्रामध्ये जन्मतः किंवा लहान वयात श्रवणदोष असलेल्या ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये श्रवण चाचणी, स्पीच थेरपी, भाषा व संवाद विकास, पूर्वप्राथमिक शिक्षण, पालक मार्गदर्शन तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रशिक्षणाचा समावेश आहे.
केंद्राच्या माध्यमातून योग्य वेळी निदान आणि सातत्यपूर्ण प्रशिक्षण मिळाल्याने अनेक बालकांना ऐकणे व बोलणे शक्य झाले असून, त्यांना नियमित शाळांमध्ये प्रवेश घेऊन इतर मुलांप्रमाणे शिक्षण घेण्याचा आत्मविश्वास मिळत आहे. त्यामुळे हे केंद्र श्रवणदोष असलेल्या बालकांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.
तज्ज्ञांच्या मते, श्रवणदोषाचे लवकर निदान आणि त्वरित पुनर्वसन (Early Detection & Early Intervention) अत्यंत महत्त्वाचे असते. कारण मुलाच्या मेंदूची भाषा आत्मसात करण्याची आणि बोलणे शिकण्याची क्षमता जन्मापासून साधारण सहा वर्षांपर्यंत सर्वाधिक विकसित होत असते. या कालावधीत योग्य श्रवणयंत्र किंवा आवश्यकतेनुसार कॉक्लिअर इम्प्लांटसह नियमित वाचा व भाषा प्रशिक्षण दिल्यास मुलाला ऐकणे, बोलणे आणि सामान्य शाळेत शिक्षण घेणे अधिक सहज शक्य होते.
दौंड व परिसरातील पालकांनी आपल्या मुलांच्या श्रवणक्षमतेबाबत कोणतीही शंका असल्यास विलंब न करता तपासणी करून घ्यावी आणि योग्य वेळी उपचार व पुनर्वसन सुरू करावे, असे आवाहन कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्कासाठी : ७०४०६६८०७१ / ९२८४८५०७५०.




