अण्णापूर शाळेचा आगळावेगळा उपक्रम; उन्हाळी संस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना संस्कारांचे धडे

शिरूर, प्रतिनिधी :विवेकानंद फंड 

उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग करत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, स्वयंशिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्या उद्देशाने अण्णापूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुरू करण्यात आलेले उन्हाळी संस्कार शिबिर सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. २ मेपासून सुरू झालेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात शाळेतील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून, पुणे जिल्ह्यातील एकमेव अशा प्रकारचे शिबिर म्हणून या उपक्रमाची चर्चा होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात स्वयंशिस्त, व्यायाम, योगा, प्राणायाम, प्रार्थना, मनःशांती, आत्मविश्वास, सहकार्य वृत्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर देण्यात आला आहे. दररोज सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत राष्ट्रगीत, प्रार्थना, सुविचार, संस्कार कथा, प्रेरणादायी व्हिडिओ, विविध हस्तकला तसेच पारंपारिक खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कारांचे धडे दिले जात आहेत.

मुख्याध्यापक किसन शिंदे यांनी दररोज विद्यार्थ्यांना संस्कार कथा सांगून प्रेरित केले. तानाजी पाटील यांनी व्यायामाचे मार्गदर्शन केले, तर माऊली कुरंदळे यांनी सुविचार कथनासह पारंपारिक खेळांचे प्रशिक्षण दिले. खडे, आठ चल्लस, चिंचोके, बुद्धिबळ यांसारख्या ग्रामीण खेळांबरोबरच कॅरम, सापशिडी, सुडोकू, बॅडमिंटन आणि क्रिकेटचाही विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.

या शिबिरात विलास महाराज पवार, ओंकार महाराज घेगडे, बबनराव गुंड, सुभाष कुरंदळे आणि संगीताताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कल्पना कुरंदळे, छाया गुंड आणि जयश्री निचीत यांनी बैठे खेळ शिकवत विद्यार्थ्यांना पारंपारिक खेळांची ओळख करून दिली. प्रफुल्ल सरदार यांनी विविध हस्तकलेची प्रात्यक्षिके सादर केली.

या संस्कार शिबिरात तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल कुरंदळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष शिंदे, माजी सभापती वाल्मिकराव कुरंदळे आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसाठी दररोज खाऊची व्यवस्था केली. विशेष म्हणजे, शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वतःच्या उन्हाळी सुट्ट्यांचा त्याग करून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

या अभिनव उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रीतम कोकणे, विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, माजी सभापती वाल्मिकराव कुरंदळे, दादा पाटील, सरपंच दीपिका शिंदे, उपसरपंच मनीषा शिंदे तसेच अण्णापूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *