Rjnews27marathi- रमेश बनसोडे
शिरूर : शहरातील हुडको कॉलनी परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिच्यासह पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कल्याणी शहाजी पवार ऊर्फ सौ. कल्याणी अशोक आवाळे (वय 32, व्यवसाय वकील, रा. हुडको कॉलनी, शिरूर) या 8 मे रोजी रात्री सुमारे अकराच्या सुमारास राहत्या घराच्या टेरेसवर जात असताना मागील दिवशी झालेल्या प्रकाराबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी शेजारी राहत असलेल्या मच्छिंद्र पवार यांच्या घराचा दरवाजा वाजवला. त्यावेळी दिपाली ऊर्फ प्रिती मच्छिंद्र पवार यांनी घरातून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर मच्छिंद्र पवार यांनी फिर्यादीचा हात पकडून घरामध्ये ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचवेळी किशोर पवार तेथे आला असता, “आज हिला जिवे मारून टाकू,” असे म्हणत तिघांनी मिळून फिर्यादीवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. मच्छिंद्र पवार यांनी घरातील धारदार सुर्याने डोक्यावर वार केल्याचा, तर दिपाली पवार यांनी लाकडी दांडक्याने खांदा व पाठीवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, आरडाओरडा ऐकून फिर्यादीचे पती सागर आवाळे मदतीसाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जिन्यातून खाली ओढत नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी मच्छिंद्रनाथ शहाजी पवार, किशोर शहाजी पवार, दिपाली ऊर्फ प्रिती मच्छिंद्र पवार (रा. हुडको कॉलनी, शिरूर) तसेच प्रकाश बाळू बो-हाडे (रा. पारधीवस्ती, शिरूर) यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार वारे यांनी दाखल प्रक्रिया पूर्ण केली असून पुढील तपास पोलीस हवालदार कोथळकर करीत आहेत. या प्रकरणावर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.




