कवठे येमाई येथे हॉटेलच्या आडोशाला अवैध दारू विक्रीचा पर्दाफाश; शिरूर पोलिसांची कारवाई

शिरूर (प्रतिनिधी) Rjnews 27 मराठी 

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात अष्टविनायक हायवेवरील एका हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर शिरूर पोलिसांनी कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास कवठे येमाई गावच्या हद्दीत, शिरूर-मलठण मार्गावरील अष्टविनायक हायवेवरील येमाई चौकाजवळील “हॉटेल मराठा खानावळ”च्या पाठीमागील बाजूस ही कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी लहु सखाराम वागदरे (वय 55, रा. कवठे येमाई) हा इसम बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारूचा साठा बाळगून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सागर कैलास बोराडे (पोलीस कॉन्स्टेबल, शिरूर पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी विविध कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा जप्त केला. यात संत्रा फ्लेव्हर देशी दारूच्या 27 बाटल्या, विविध ब्रँडच्या व्हिस्कीच्या बाटल्या असा एकूण 4,940 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध अवैध दारू साठवणूक व विक्रीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी चव्हाण करत आहेत. कारवाईत पोलीस कर्मचारी भगत यांनी दाखल अधिकारी म्हणून काम पाहिले.
या घटनेमुळे परिसरात अवैध धंद्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केल्याची चर्चा रंगली असून अशा कारवायांमुळे बेकायदेशीर व्यवसायांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *