रावडेवाडीत शेतीच्या रस्त्यावरून वाद; शेतकऱ्यासह भावाला मारहाण
सह्याद्रीचा आवाज – बालाजी कांबळे
शिरूर : शिंदेवाडी (ता. शिरूर) येथील गट क्रमांक २८ मधील शेतीच्या रस्त्यावर पाणी सोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकऱ्यासह त्याच्या भावाला मारहाण केल्याची घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडल्याची फिर्याद शिरूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अजित भानुदास शिंदे (वय ३४, रा. शिंदेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, शिंदे यांनी रावडेवाडी हद्दीतील गट क्रमांक २८ मध्ये १४ गुंठे जमीन खरेदीखताद्वारे घेतली असून, या क्षेत्रात त्यांनी मेथीचे पीक घेतले आहे. ११ ऑक्टोबर रोजी ते भाऊ अक्षय यांच्यासह मेथी काढून पिकअप वाहनातून ती बाहेर नेण्याच्या तयारीत होते.
त्यावेळी शेजारील जबाजी रखमा तिखोळे यांनी सामायिक रस्त्याच्या चारीवर पाणी सोडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मेथी घेऊन जाणारे वाहन बाहेर काढता येणार नसल्याचे सांगितल्यावर दोघांमध्ये वाद झाला. या वादातून जबाजी तिखोळे यांनी जवळील दगड उचलून अजित शिंदे यांच्या डाव्या गुडघ्यावर मारल्याचा, तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी अजित यांचा भाऊ अक्षय शिंदे पुढे आला असता त्याच्याशीही धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर जबाजी रखमा तिखोळे, रखमा सतू तिखोळे, संताजी रखमा तिखोळे, अनिकेत आनंदा तिखोळे, ऋतिक संताजी तिखोळे, भाऊसाहेब बिरा तिखोळे, हौसाबाई जबाजी तिखोळे व शालन आनंदा तिखोळे हे घटनास्थळी आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
यावेळी अनिकेत तिखोळे यांच्या हातात कोयता असल्याचे तसेच त्याच्या मुठीने अजित शिंदे यांच्या डाव्या खांद्यावर मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच रखमा तिखोळे यांनी कुर्हाडीसदृश हत्यार हातात घेऊन अजित व त्यांचे भाऊ अक्षय यांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इतर व्यक्तींनीही दोघांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर अजित शिंदे व त्यांचे भाऊ अक्षय हे टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे गेले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी यादी दिल्यानंतर उपचार घेत त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
या प्रकरणी जबाजी रखमा तिखोळे यांच्यासह एकूण आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वायाळ (क्र. १५८१) करीत आहेत. दाखल अमलदार म्हणून पोलीस हवालदार पालवे (क्र. २१८) यांनी कार्यवाही केली आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560





