वाघोलीतील महावितरणच्या तीन शाखांचा ग्रामीणमधून शहरी विभागात समावेश; आमदार माऊली आबा कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
वाघोली : प्रतिनिधी- रमेश बनसोडे
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, वाघोली परिसरातील महावितरणच्या वाघोली, साईसत्यम आणि विठ्ठलवाडी-वाघोली या तीन शाखांचा ग्रामीण विभागातून शहरी विभागात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला असून, या निर्णयामुळे वाघोली परिसरातील वीज वितरण व्यवस्थेचे प्रशासकीय नियंत्रण शहरी विभागाकडे वर्ग झाले आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्येतील वाढ आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण मंडळ कार्यालयांतर्गत मुळशी विभागातील हडपसर ग्रामीण उपविभागात समाविष्ट असलेल्या वाघोली, साईसत्यम आणि विठ्ठलवाडी-वाघोली या तीन शाखांचा कार्यभार आता रस्तापेठ शहर मंडळ कार्यालयांतर्गत नगररोड विभागातील विश्रांतवाडी उपविभागाकडे सोपविण्यात आला आहे. या तीन शाखांमध्ये मोठ्या संख्येने वीज ग्राहक असून, वाघोली शाखेतील २५ हजार ६६५, साईसत्यम शाखेतील २७ हजार ७५९ आणि विठ्ठलवाडी-वाघोली शाखेतील २४ हजार ९०२ अशा एकूण ७८ हजार ३२६ वीज ग्राहकांचा या बदलात समावेश आहे.
वाघोली परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून, निवासी व व्यावसायिक क्षेत्राचा विस्तारही वेगाने झाला आहे. परिणामी वीज ग्राहकांची संख्या आणि विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे, ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे तसेच देखभाल-दुरुस्ती आणि प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने होणे आवश्यक होते. या बाबी लक्षात घेऊन आमदार माऊली आबा कटके यांनी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भूषण कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने १७ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशानुसार संबंधित तीन शाखांचे प्रशासकीय नियंत्रण शहरी विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे वाघोली आणि परिसरातील वीज ग्राहकांच्या समस्या, तक्रारी, वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे अधिक सुसूत्र पद्धतीने हाताळण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
याबाबत आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी सांगितले की, वाघोली आणि परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असून वीज ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे येथील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणे आणि नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण होणे आवश्यक होते. वाघोलीतील महावितरणच्या शाखांचा ग्रामीण विभागातून शहरी विभागात समावेश व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद असून, या निर्णयामुळे वीज ग्राहकांना अधिक कार्यक्षम सेवा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाघोली परिसरातील वाढत्या नागरी गरजा आणि वीज ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता महावितरणच्या तीन शाखांचा शहरी विभागात करण्यात आलेला समावेश हा महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल मानला जात आहे. या निर्णयामुळे वीज वितरण व्यवस्थेतील समन्वय, ग्राहक सेवा आणि तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560






