सासवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी पिस्तूलासह सराईत आरोपी जेरबंद

सासवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी पिस्तूलासह सराईत आरोपी जेरबंदसासवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी पिस्तूलासह सराईत आरोपी जेरबंद

गुप्त माहितीच्या आधारे सैनिक कॅन्टीन परिसरात कारवाई; दुचाकीसह तब्बल ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Rjnews27 मराठी – विकास साळुंके 

सासवड : सासवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले असून, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एका सराईत आरोपीला गावठी पिस्तूलासह रंगेहात ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई ७ ऑक्टोबर रोजी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सैनिक कॅन्टीनच्या पाठीमागील परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित राजू माने (वय २४, रा. कात्रज) याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीची तपासणी केली असता, तिच्या टूल बॉक्समध्ये सुमारे ५० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व मॅगझिन आढळून आले. पोलिसांनी पिस्तूल, मॅगझिन आणि दुचाकी असा एकूण ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या रोहित माने याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्यावर ‘मोका’सह अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याची पार्श्वभूमीही पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. गावठी पिस्तूल त्याच्याकडे नेमके कशासाठी होते, तसेच त्याचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी करण्यात आला आहे का, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, पुणेचे अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार तसेच भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली. पथकात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलीस अंमलदार दत्तात्रय काळे, पोहवा जाधव, पोना गोकुळ हिप्परकर, पोकॉ तुषार लोंढे आणि पोकॉ प्रविण शेंडे यांचा सहभाग होता.

सासवड पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत असून, गावठी पिस्तूल त्याच्याकडे कसे आले आणि त्याचा कोणत्या गुन्ह्यात वापर होणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *