सोनवडी बंधारा बचाव कृती समितीच्या पाठपुराव्याला यश
रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तत्काळ कार्यवाही; तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिल
अल्लाउद्दीन अलवी | प्रतिनिधी Rjnews27 मराठी
दौंड | शिरूर | श्रीगोंदा
दौंड, शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या सोनवडी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या बचावासाठी स्थापन करण्यात आलेल्या सोनवडी बंधारा बचाव व पाणी हक्क कृती समितीच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. समितीने दिलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्याची प्रशासनाने दखल घेत, नियोजित आंदोलनाच्या एक दिवस आधीच म्हणजे ५ ऑक्टोबर रोजी सोनवडी बंधाऱ्यावर ढापे टाकण्याच्या कामास सुरुवात केली. त्यामुळे बंधारा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोनवडी बंधारा हा दौंड तालुक्यातील सोनवडी, नानवीज, गिरीम, बेटवाडी, नांदखिले-गार, कानगाव, शिरूर तालुक्यातील तांदळी, गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक, मांडवगण फराटा, इनामगाव, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू, सांगवी दुमाला आणि काष्टी यांसह परिसरातील अनेक गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील मोठ्या प्रमाणातील शेती व्यवसाय भीमा नदीतील पाण्यावर अवलंबून आहे.
मात्र, मागील काही काळापासून दुष्काळसदृश परिस्थिती, पाण्याची कमतरता आणि पिकांवर आलेल्या करपा रोगामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला होता. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीत सोनवडी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी प्रशासनाकडून वेळेत आवश्यक नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत होती.
तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांची एकजूट
या पार्श्वभूमीवर दौंड, शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘सोनवडी बंधारा बचाव व पाणी हक्क कृती समिती’ स्थापन केली. बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी समितीच्या माध्यमातून करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, भाजपा नेते आप्पासाहेब पवार, शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय खोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष अशोक जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब ढमढेरे, शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष ऋषिकेश निंबाळकर, भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका युवक अध्यक्ष तथा माजी उपसरपंच सिद्धेश्वर नांद्रे पाटील आणि अखिल ग्राहक पंचायतीचे गणेश जगताप यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी करीत आहेत.
६ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
सोनवडी बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास ६ ऑक्टोबर रोजी दौंड-मनमाड रोडवरील पवार व्हेज हॉटेल, सोनवडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने दिला होता.
आंदोलनाची तयारी सुरू असतानाच प्रशासनाने याची गंभीर दखल घेत ५ ऑक्टोबरपासूनच सोनवडी बंधाऱ्यावर ढापे टाकण्याचे काम सुरू केले. त्यामुळे प्रस्तावित रास्ता रोको आंदोलनापूर्वीच प्रशासनाने कार्यवाही केल्याने शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दर्जेदार रबरी सिलिंगची मागणी
दरम्यान, बंधाऱ्यात पाणी अडविल्यानंतर पाण्याची गळती होऊ नये आणि उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी दर्जेदार रबरी सिलिंगचा वापर करण्यात यावा, अशी मागणीही शेतकरी संघटना आणि क्रांतिसिंह नाना ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले यांनी केली आहे.
“बंधाऱ्यात ढापे टाकण्याची कार्यवाही सुरू झाली असली तरी पाणी गळती होणार नाही, यासाठी दर्जेदार रबरी सिलिंगचा वापर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कासाठी समितीचा पाठपुरावा पुढेही सुरू राहणार आहे,” असे शिवाजीराव नांदखिले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
पाणी साठल्यास शेतीला मोठा आधार
सोनवडी बंधाऱ्यात पाणी अडल्यास दौंड, शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील अनेक गावांमधील शेतीला मोठा आधार मिळणार आहे. पाणी उपलब्ध झाल्याने खरीप व रब्बी हंगामातील पिकांना फायदा होण्याबरोबरच ऊस, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांनाही त्याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नासाठी तीन तालुक्यांतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनांनी एकत्र येत प्रशासनावर दबाव निर्माण केला. या एकजुटीमुळे प्रशासनाला तातडीने कार्यवाही करावी लागल्याने सोनवडी बंधारा बचाव कृती समितीच्या आंदोलनाला प्राथमिक यश मिळाल्याचे चित्र आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







