वढू ते वाघोली-बकोरी पाणीपुरवठा योजना: प्रशासकीय विलंबावर आमदार कटके यांची नाराजी; तातडीने कार्यवाहीचे निर्देश

वाघोली-बकोरी रोड पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; आमदार माऊली आबा कटके यांची प्रशासनाला लेखी ताकीद

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे 

वाघोली, दि. १७ सप्टेंबर – सन २०१९ मध्ये पीएमआरडीएअंतर्गत मंजूर झालेली वढू ते वाघोली-बकोरी रोड पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात कार्यान्वित होऊनही बकोरी रोड परिसरातील नागरिकांना अद्याप पाणी मिळत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.

 

सुमारे २२ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून उभारण्यात आलेला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही प्रशासकीय विलंबामुळे नागरिकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत असल्याची बाब कटके यांनी गांभीर्याने घेतली आहे. बकोरी रोड परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये सुमारे २० हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास असून, पाण्याची वाढती गरज लक्षात घेता ही योजना तातडीने सुरू करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

या योजनेचे पाणी सोसायट्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या वितरण वाहिनीचा वापर करण्याची मागणीही कटके यांनी केली आहे. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना लेखी सूचना देण्यात आल्या असून, पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यवाहीचा लेखी अहवाल आमदार जनसंपर्क कार्यालयास तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

दरम्यान, वाघोलीकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे भामा-आसखेड योजनेचे सुमारे २३० कोटींचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून पाण्याच्या टाक्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या वर्षभरात वाघोलीकरांना या योजनेतून हक्काचे पाणी मिळणार असल्याचा विश्वास कटके यांनी व्यक्त केला. तसेच, २२ कोटींच्या पीएमआरडीए योजनेतून बकोरी रोड परिसरासाठी ५ एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, वाघोलीच्या विकासाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

“वाघोलीकरांना येत्या वर्षभरात भामा-आसखेड योजनेतून हक्काचे पाणी मिळणार आहे. ₹२३० कोटींच्या या योजनेचे ७०% काम पूर्ण झाले असून पाण्याच्या टाक्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, ₹२२ कोटींच्या पीएमआरडीए योजनेतून बकोरी रोड परिसरासाठी ५ एमएलडी पाणी उपलब्ध करून दिले आहे. वाघोलीच्या विकासाच्या दिशेने हे आमचे महत्त्वाचे पाऊल आहे,” असे आमदार माऊली आबा कटके यांनी ठामपणे सांगितले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights