केडगाव | प्रतिनिधी – विकास साळुंके
अभिनय क्षेत्रात सातत्याने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणारा युवा कलाकार अनोश ठोंबे याने आता छोट्या पडद्यावरही दमदार पाऊल ठेवले आहे. कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘स्वामी समर्थ’ मालिकेत ‘शिवा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अनोशने आपल्या अभिनय कारकिर्दीला नवे वळण दिले आहे. दि. २४ जुलै २०२६ पासून प्रसारित होणाऱ्या या मालिकेचे दररोज रात्री ८.१० वाजता प्रसारण होत असून, अनोशच्या सहजसुंदर आणि प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
अनोश ठोंबेने अभिनय क्षेत्रात मराठी चित्रपट ‘प्रथम यद्या’ मधून पदार्पण केले. त्यानंतर ‘शाळा २’, ‘टेन क्लास डायरी’ आणि ‘इलेव्हन क्लास डायरी’ या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या. प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपत त्याने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महाविद्यालयीन नाट्यविश्वातील प्रतिष्ठेच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील नाटकामधील त्याच्या अभिनयालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती.
अनोशच्या या यशामागे त्याच्या कुटुंबाचे मोलाचे योगदान आहे. त्याचे वडील राजू हरिभाऊ ठोंबे हे भैरवनाथ विद्यालय, खुटबाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर आई अर्चना राजू ठोंबे या मनोरमा मेमोरियल हायस्कूल, केडगाव येथे शिक्षिका आहेत. शिक्षणाबरोबरच संस्कार, मेहनत आणि कलाविषयीची जिद्द त्यांनी अनोशमध्ये रुजवली. याच बळावर त्याने अभिनय क्षेत्रात सातत्याने प्रगती साधली आहे.
चित्रपट, रंगभूमी आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांत प्रभावी उपस्थिती नोंदवत अनोश ठोंबेने आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली आहे. ‘स्वामी समर्थ’ मालिकेतील ‘शिवा’ ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास कलारसिक व्यक्त करत आहेत. त्याच्या या यशामुळे केडगावसह परिसरात आनंदाचे वातावरण असून, मराठी मनोरंजन विश्वात तो भविष्यात आणखी मोठी झेप घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




