खुटबाव येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका; पाच जण जेरबंद

दौंड प्रतिनिधी : विकास साळुंके

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दुर्गम भाग तसेच एकांतिक वस्तीमध्ये घरफोडी व जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत खुटबाव (ता. दौंड) परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथके तयार केली होती. त्याच अनुषंगाने २७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवत पोलिसांच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, खुटबाव गावाजवळ साळोबा वस्तीच्या रस्त्यावर पाच ते सहा इसम बेकायदेशीर शस्त्रांसह जमा झाले असून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबले आहेत.

माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांनी संयुक्त सापळा रचला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले, तर एक जण पसार झाल्याची माहिती आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अजित मुकेश रगडे (वय ५०), मच्छिंद्र पोपट ऊर्फ काकाभाऊ रगडे (वय ३५), सायबंद मनीलाल ऊर्फ संजीत राजपूत (वय २८), दिपेश करुणासिंग मनावत (वय २१) तसेच एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे. आरोपी हे पुणे जिल्ह्यातील दौंड व मावळ तालुक्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून दोन लोखंडी कोयते, लोखंडी गज, मिरची पावडरची पाकिटे, दोरी तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. हे साहित्य दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचा पोलिसांना संशय आहे.

या कारवाईनंतर पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलिस स्टेशन संयुक्तपणे करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, यवत पोलीस निरीक्षक संतोष तायगावकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला असून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडून अशाच प्रकारच्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाया अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *