दौंड : प्रतिनिधी – विकास साळुंके
दौंड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बनावट नोटा प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची प्रगती करत पोलिसांनी संगनमताने गुन्हा केल्याचा निष्कर्ष काढत पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.
पोलीस तपासादरम्यान आरोपींनी परस्पर संगनमत करून बनावट नोटांशी संबंधित गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी २० जुलै २०२६ रोजी हितेश चिदानंद चलवादी (रा. पासलकरवस्ती, दौंड), प्रेम संजय मंजुळे (सध्या रा. मोशी, पुणे; मूळ रा. दौंड), विनोद विष्णू मुंडे (सध्या रा. नऱ्हे, पुणे; मूळ रा. परळी वैजनाथ, बीड), रणजीत भास्करराव डिग्रज (सध्या रा. भोसरी, पुणे; मूळ रा. अकोल, अमरावती) आणि ओमकार सतीश मोरे (रा. देवगाव, ता. केज, जि. बीड) यांना ताब्यात घेऊन अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कालावधीत आरोपींच्या राहत्या घरांची झडती घेऊन गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य, बनावट नोटा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा अन्य पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणामागे आणखी काही व्यक्तींचा सहभाग आहे का, बनावट नोटांचे जाळे किती मोठे आहे आणि त्या नोटांचा पुरवठा कोठून होत होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे बनावट चलनाच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.




