जिद्दीच्या जोरावर जिरेगावच्या ऋतिकने गाठले डॉक्टरकीचे शिखर; जॉर्जियातून एमबीबीएस पदवी संपादन करून गावाचा वाढविला मान

प्रतिनिधी – योगेश राऊत

पाटस, ता. दौंड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहण्याबरोबरच ती प्रत्यक्षात उतरविण्याची क्षमता आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर सिद्ध केली आहे. दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील ऋतिक एकनाथ बोदरकर याने परदेशातील जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून एमबीबीएस (MBBS) पदवी संपादन केली असून, त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे जिरेगावसह संपूर्ण दौंड तालुक्याचा मान उंचावला आहे.

लहानपणापासूनच डॉक्टर बनून समाजाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या ऋतिकने अनेक अडचणींचा सामना करत शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला. ग्रामीण भागातील मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि परदेशात शिक्षण घेण्याचे मोठे आव्हान असूनही त्याने आत्मविश्वास, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अथक परिश्रम यांच्या बळावर जॉर्जियामध्ये प्रवेश मिळवला. तेथील कठीण अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करून एमबीबीएस पदवी मिळवत त्याने आपल्या स्वप्नाला यशाचे पंख दिले.

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता असते. मात्र या संपूर्ण प्रवासात ऋतिकच्या कुटुंबाने त्याला भक्कम आधार दिला. वडील एकनाथ बोदरकर, आई तसेच भाऊ प्रतीक बोदरकर यांनी प्रसंगी आर्थिक अडचणींना सामोरे जात मुलाच्या शिक्षणासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. त्यांच्या त्याग, विश्वास आणि प्रोत्साहनामुळेच ऋतिकला हे यश संपादन करता आले. त्यामुळे हे यश केवळ ऋतिकचे नसून संपूर्ण बोदरकर कुटुंबाच्या संघर्षाचे आणि त्यागाचे प्रतीक ठरले आहे.

मुलाने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केल्यामुळे बोदरकर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आलेल्या या यशामुळे आई-वडिलांनी समाधान आणि अभिमान व्यक्त केला. आपल्या मुलाने कुटुंबाचे नाव उज्ज्वल केल्याची भावना त्यांनी व्यक्त करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ऋतिक बोदरकर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कुरकुंभ, दौंड, बारामती, अमरावती, नागपूर तसेच विविध भागांतील शिक्षकवृंद, नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही त्याच्या यशाचे कौतुक केले जात असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहे.

यापुढे वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प ऋतिकने व्यक्त केला आहे. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि कुटुंबाची साथ असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, याची प्रचिती ऋतिक बोदरकर यांच्या यशस्वी वाटचालीतून पुन्हा एकदा आली आहे. त्यांच्या या यशामुळे जिरेगावसह संपूर्ण दौंड तालुक्याला अभिमान वाटत असून, अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या यशाची कहाणी प्रेरणेचा दीप ठरत आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *