शिरूर, प्रतिनिधी : रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे जुन्या कौटुंबिक वादातून झालेल्या वादावादीचे पर्यवसान मारहाणीत झाले. या घटनेत चार जण जखमी झाले असून सहा जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 10 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास इनामगाव येथील श्रीकांत ट्रॅक्टर्स गॅरेजसमोर घडली. याप्रकरणी रामदास पाटीलबुआ मचाले (वय 49, व्यवसाय – शेती, रा. इनामगाव, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा प्रतिक मचाले हा शेतात जात असताना आरोपींनी त्याची मोटारसायकल अडवली. त्यावेळी जुन्या वादावर तडजोड करून पैसे देऊन विषय मिटविण्याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र प्रतिकने संबंधित प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.
या वादातून आरोपींनी प्रतिक मचाले याला गच्च धरून हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. भांडण सोडविण्यासाठी आलेले फिर्यादी रामदास मचाले, त्यांची पत्नी मिनाक्षी मचाले तसेच दादा पाटीलबुआ मचाले यांनाही आरोपींनी लाकडी दांडके तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रमेश सोनबा वाळुंज, इंद्रजित संपतराव वाळुंज, मयुर रमेश वाळुंज, चंद्रकांत संपत वाळुंज, शहाजी सोनबा वाळुंज आणि प्रसाद शहाजी वाळुंज (सर्व रा. इनामगाव, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत रामदास मचाले, मिनाक्षी मचाले, दादा पाटीलबुआ मचाले आणि प्रतिक मचाले हे जखमी झाले असून, घटनेत लाकडी दांडक्यांचा वापर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गवळी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




